शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्र मधील लेख
एक व्यक्ती एका लहान मुलाला विचारतो की तू एवढा गोड कसा बोलतो?, तुला कोणी शिकवले?.. तेव्हा तो लहान मुलगा म्हणतो, "कोणी नाही, आमच्या घरात सर्व असेच बोलतात!!" पालकांनो,भाषेवरील संस्कार हे आपल्या घरातून, शाळेतून, आजूबाजूच्या परिसरा मधून होत असतात.
मुलं भाषा कशी शिकतात तर सर्वप्रथम मुलं ऐकतात मग ते बोलायला शिकतात आणि मग लिहायला. भाषाशास्त्र आणि मेंदूमानस शास्त्र सांगतं की, सहा वर्षापर्यंत मुलं चार भाषा शिकू शकतात.
आता आपल्या मुलांची उत्तम भाषा बोलण्यासाठी शिकण्यासाठी आणि जास्तीत जास्त शब्दसंग्रह वाढण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स नमूद करतो.
१) पहिले तर मुलांना भरपूर गोष्टी सांगा. गोष्टीच्या पुस्तकातून दररोज एक ते दोन गोष्टी मुलांना ऐकवा. याच्यातून मुलांची कल्पना शक्ती वाढते, शब्दसंग्रह वाढतो. जेव्हा तुम्ही गोष्ट सांगत असतात त्यावेळेस नवीन शब्दाचा तुम्ही अर्थ, त्याचे स्पष्टीकरण जरूर करा. गोष्ट सांगताना त्याचा/तिच्या रोजचा दैनंदिन जीवनातील गोष्टीशी त्याचा संबंध जोडा.
२) भाषा विकासासाठी गोष्टी ऐकणे महत्त्वाचे आहेत परंतु या गोष्टी आयत्या रेडीमेड कार्टून मधल्या टीव्ही मधल्या यूट्यूब चैनल मधल्या नको. याच्यातून मुलांना गोष्ट समजते पण सर्वात मोठ नुकसान होतं ते म्हणजे मुलांची कल्पनाशक्ती दाबली जाते. रेडीमेड गोष्टीतून मुलांना रेडीमेड चित्र त्यांच्या डोळ्यासमोर येतात आणि कल्पनाशक्ती चा विकास होत नाही. जेव्हा आई-वडील, शिक्षक गोष्ट सांगतात त्यावेळेस मुलांच्या मनाच्या पटलावर ते स्वतः चित्र व्हिज्युअलाइझ करतात. डोळ्यासमोर तसे प्रतिमा आणतात आणि या प्रक्रियेतून मुलांची कल्पनाशक्ती विकसित होते. त्याचबरोबर भाषासुद्धा सुधारते.
३) मुलांना गोष्ट सांगताना आवाजाचा चढ-उतार करून गोष्ट सांगा. याने प्रत्येक शब्द वाक्य कशी बोलायची याचा अंदाज मुलांना येतो.
४) आपण जेव्हा मुलांशी बोलतो त्यावेळेस पूर्ण वाक्यात त्यांच्याशी बोला.
५) मुलांचा टीव्ही युट्युब वरील कार्टून हे कमीत कमी दाखवा. कारण कार्टून मधली भाषा ती अजिबात चांगली नसते. मार दिया, तोड दिया, फोड दिया असे वाक्य सर्रास असतात.
६) कुठली भाषा सुधारण्यासाठी बोलणे बोलणे बोलणे आणि वाचणे वाचणे वाचणे ही प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे
७) आपण जेव्हा मुलांशी बोलतो तेव्हा बोलताना आपल्या मध्ये प्रचंड उत्साह हवा.
८) कुठलीही भाषा मुलांना येण्यासाठी ती प्रथम कानावर पडणे आवश्यक आहे. इंग्रजी भाषे बाबतीमध्ये तसंच आहे. इंग्रजी भाषा मुलांना उत्तम येण्यासाठी इंग्रजी भाषेतील गोष्टी मुलांना वाचून दाखवा.
९) त्यासाठी इंग्लिश ऑडिओ बुक स्टोरीज हे माध्यम अत्यंत छान आहे.
१०) ज्यांच्या घरी इंग्रजी कमी बोलले जाते त्यांनी जवळपास नेटिव्ह टीचर शोधा. जी आपले नातेवाईक, ओळखीतली, शेजारचे असू शकते. त्यांच्याकडे आठवड्यातून दोनदा पाठवून मुलांशी इंग्रजी भाषेमध्ये संभाषण करायला सांगा. हे दुसर्या भाषेचे बाबतीतही होऊ शकते. जसे तुम्ही महाराष्ट्रीयन असाल तर गुजराती फॅमिलीकडे मुलांना भाषा ऐकायला पाठवणे.
११) मुलं इंग्रजी शिकताना सुरुवातीला कमीत कमी व्याकरणाचे नियम लावा.
१२) मुलांचा शब्दसंग्रह वाढवायचा असेल तर कुठलाही नवीन शब्द किमान चार वेळा तर जास्तीत जास्त बारा वेळा वेगवेगळ्या वाक्यांनमधून त्याच्या कानावर पडले पाहिजे. त्याचं रिपिटेशन व्हायला हवे.
१३) मुलांचा शब्दसंग्रह वाढण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या जागी घेऊन जा. जेव्हा आपण वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देतो त्या वेळेस त्या जागेबद्दल लाईव्ह कॉमेंट्री सारखे त्यांना माहिती ती द्या. यामध्ये मुलं बरेच नवीन शब्द शिकतात.
१४) घरातील वस्तुंना लेबल करू शकतात. वेगवेगळ्या भाषेतील लेबल करू शकतात. तसेच मुलांना भाषा शिकवताना फ्लॅश कार्डचा उत्तम वापर होतो. आपण घरी बनवू शकतो.
१५) अधून मधून मुलांचे डोळे, कान, घसा हे तज्ञ डॉक्टरांकडे जाऊन तपासा. आजकाल लेझी आईज (आळशी डोळे) यांचे आजार वाढत चालला आहे.
आता आपल्या पाल्याचे शुद्ध उच्चारा साठी काही महत्त्वाच्या टिप्स..
१) मुलांशी बोलतांना लाडात बोलू नये, बोबडे बोलू नये. मुलं आपल्याकडून शिकत असतात. बोबडे शब्द त्यांच्या मेंदूमध्ये स्टोअर होतात आणि त्याच पद्धतीने उच्चार होत असतात.
२) मुलांना लहानपणी भरपूर संस्कृत भाषा, संस्कृत श्लोक ऐकवा. यासाठी मोबाईल ॲप्लिकेशन तसेच बाजारातून विविध सीडी उपलब्ध आहेत. संस्कृत भाषेने उच्चार स्पष्ट होतात.
३) जाणीपूर्वक मुलांकडून काही श्लोक पाठ करून घ्या जसे शिव तांडव स्तोत्र.
४) मुलांना रोज एक अवघड शब्दाची ओळख करून द्या. हे सगळे तुम्ही स्वतः बोला आणि ते ऐकतील मग ते तुमच्या मागे पुन्हा बोलतील. उदाहरणार्थ पद्मावती, सहस्त्रनाम.. हे शब्द कुठल्याही भाषेमधले आपण निवडू शकता.
५) मुलांना ओमकार शिकवा. तुम्हीसुद्धा त्यांच्याबरोबर ओमकार करा. सोबत रोज एक मिनिट तरी श्वासोश्वास तंत्र (ब्रीदिंग टेक्निक) मुलांना शिकवा.
६) तुम्हाला मुलं काही ही सांगत असतील तर तुम्ही मन लावून ऐका. तुम्ही कामात गडबडीत असाल तर किमान तुम्ही ऐकत आहे असे भासवा. ते बोलताना मध्ये मध्ये अडवू नका. बोलताना त्यांना प्रोत्साहित करा अन्यथा ते बोलणं सोडून देतात.
७) सर्वात महत्वाचं ते बोलत असताना मध्ये तुम्ही त्यांचे वाक्य करेक्ट करू नका. त्यांचं वाक्य पूर्ण झालं.. त्यांचं म्हणणं झालं की मग सांगा "योग्य" काय आहे. नाहीतर मुलं बोलण्याचा आत्मविश्वास हरवून बसतील. काही पालकांना मुलांना प्रत्येक शब्दात करेक्ट करण्याची सवय असते. तसे करू नका.
८) मुलांचे उच्चार स्पष्ट होण्यासाठी "टंग ट्विस्टर" वाचायला द्या. जसे आपण लहानपणी "कच्चा पापड पक्का पापड" किंवा काकाने काकू चे कामाचे कागद कापले इत्यादी.. इंग्रजी हिंदी अशा विविध भाषांमधले हे टंग ट्विस्टर मुलांना म्हणायला सांगावे.
९) ळ ल ज झ ज्ञ अशा अक्षरांच्या शब्दांच्या कविता किंवा वाक्य बनवून त्यांना म्हणायला सांगणे.
१०) लहानपणी भरपूर बडबड गीते, नर्सरी राईम्स मुलांना म्हणायला सांगणे. याच्यातून लक्षात ठेवण्याची एक कला विकसित होते.
मी काही भाषा तज्ञ नाहीये पण विविध मुलांना निरीक्षण करताना काही गोष्टी जाणवल्या त्या या लेखातून आपल्या समोर मांडलेल्या आहेत.
सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक
(पोस्ट शेअर करू शकता)
आजकाल पालक विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे खूप असते म्हणून तक्रार करत असतात
मी विचार केला कि खरच दप्तराचे ओझे वाढले आहे का हे तपासून या. यामध्ये काही मुद्दे समोर आले जे आपल्यासमोर मांडत आहे.
१. विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे वाढले आहे पण ते फक्त नोटबुक किंवा पुस्तक यांच्यामुळे नव्हे तर फॅन्सी वॉटर बॉटल, डबा टिफीन यामुळे सुद्धा.
२. बऱ्याचदा विद्यार्थी टाइमटेबल नुसार शाळेचे बँग भरत नाही, त्यामुळे सुद्धा वजन वाढते.
३. पालक विद्यार्थ्यांची बँग अतिशय दणकट कि पुढील पाच वर्षे टिकेल या हेतूने घेतात जी अतिशय जड असते त्यामुळे सुद्धा वजन वाढते.
४. काही विद्यार्थी शाळेनंतर ट्युशनला जातात त्यामुळे सुद्धा शाळेची बॅग जड होते.
५. शाळेमध्ये वर्क बुक,ड्राइंग बुक इत्यादी ठेवण्याची लॉकरमध्ये सोय असते पण आईला घरी अभ्यास घ्यायचा असतो म्हणून वर्क बुक शाळेत ठेवत नाही.
६. वजन वाढू नये म्हणून आपण 1st term ला शंभर पानांची वही आणि 2nd term ला शंभर पानांची वही केली पण विद्यार्थी सर्व विषयांच्या नोटबुक आणतात कारण ट्युशन किंवा बॅग भरायचा कंटाळा.
७. दिवसातून नऊ पिरेड पैकी सहा पिरेड अभ्यासाचे असतात. यांचेही ओझे होत असेल तर वरील मुद्दय़ांचा विचार करावा की त्यामुळे तर ओझे वाढत नाही ना. .
टाइमटेबल नुसार दप्तर भरले, शाळेमध्ये पिण्याची सोय असल्यामुळे पाण्याची बॉटल अर्धीच भरली, जमल्यास मुलांना गरमागरम टिफिन स्वतः आणून दिला, जे नोटबुक शाळेत ठेऊ शकतात ते शाळेच्या लॉकरमध्ये ठेवले तर दप्तराचे ओझे नक्कीच कमी होते.
८. मला आठवते जेव्हा मी शाळेत जायचो तेव्हा पाठीवर दप्तर टाकायचे जे खरंच जड असायचे आणि घरापासून तीन किलोमीटर दूर बसस्टॉप असायचा. . प्रचंड गर्दीत धावपळीत लटकत एसटी बस पकडायचो आणि पंधरा किलोमीटर दूरच्या शाळेत बस प्रवास करून जायचो.. बसस्टॉपपासून पुन्हा शाळेत पर्यंत अर्धा किलोमीटर चालायचे आणि हे सकाळी पाच वाजता उठून. . असं दहावीपर्यंत. कॉलेजला परिस्थिती अशीच होती फक्त कॉलेजला जड दप्तर गेले आणि एक नोट बुक आली.😊
आत्ताच्या विद्यार्थ्यांना पाहिलं तर हे जड दप्तर कोण उचलते? वडील किंवा आई घरातून लिफ्ट पर्यंत. . स्कूलबस मुलांच्या दारापर्यंत येते. बसमध्ये दप्तर सीट खाली किंवा वरती ठेवले जाते. स्कूल बस किंवा स्कूल व्हॅन शाळेच्या आत येतात. विद्यार्थी पहिल्या मजल्यावर किंवा दुसऱ्या मजल्यावर स्वतः दप्तर घेऊन जातो. . बरेचदा तिथे अँटी, स्कूल मावशी सुद्धा मदतीला असतात. प्रश्न हा आहे हे जड दप्तर मग उचलता नक्की कोण?. .आणि किती वेळ?
आपण मुलांना जरा जास्तच लाडात वाढावतो आहे असे नाही वाटत का?
हो दप्तराचं वजन वाढत आहे पण अशा मुलांसाठी जिथे स्कूल बस नाही आहेत. .बिचाऱ्या कॉर्पोरेशनमध्ये जाणाऱ्या माझा एज्युकेशन ऑन व्हील मधल्या माझ्या साडेपाच हजार विद्यार्थ्यांसाठी. . जे गरीब आहेत. . सायकलवर जाता आहेत. . पायी जाताहेत.
सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक
दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थी आणि पालकांनी वाचावा असा शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख
लोकमान्य टिळक यांचा मुलगा श्रीधर टिळक हा मॅट्रिक मध्ये दोनदा नापास झाला होता. त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी श्रीधर पंत यास पत्र लिहिले होते. त्यावेळेस लोकमान्य टिळक मंडेला तुरुंगात होते. हे पत्र सर्व पालकांसाठी त्यांच्या मुलांनी करिअर कसं निवडावं याचं हे उत्तम उदाहरण आहे.
लोकमान्य पत्राची सुरुवात अतिशय फॉर्मल पद्धतीने करतात.. पण पुढील तीन वाक्यांमध्ये त्याच्या मुलांला करीयर मंत्र देतात. ते पत्रात सुरवातीस लिहितात की, "या आधी तू मॅट्रिकमध्ये दोनदा नापास झालेला आहे. मॅट्रिक चे वर्ष महत्त्वाचं असतं. मॅट्रिक पास झाल्यानंतर तुला काय व्हायचे ते तू ठरव..." आता या ठिकाणी लोकमान्य त्यांच्या मुलाला तू अमुकच व्हायला पाहिजे तमुकच झाला पाहिजे असे काही म्हणत नाही. आपण पालक आपल्या इच्छा मुलांवर लादत असतो. मला डॉक्टर व्हायचं होतं पण शक्य झाले नाही म्हणून तू डॉक्टर हो.. इंजिनिअर हो असं काही लोकमान्य म्हणत नाही.
ते स्पष्ट म्हणतात, "श्रीधर मॅट्रिक झाल्यानंतर तुला काय करायचं ते तू ठरव, चांभार व्हायचं तर चांभार हो...". आता या दुसऱ्या वाक्यात त्यांनी सर्व काम, सर्व नोकऱ्या, सर्व व्यवसाय हे समानतेचे असतात ते सांगतात. प्रत्येक कामाला प्रतिष्ठा असते, कुठलंही काम छोटं मोठं हे अजिबात नसतं हे त्यांनी त्याला स्पष्ट केलं. त्या काळामध्ये जातीव्यवस्था खूप होती. जातीव्यवस्था तोडण्यासाठी लोकमान्य आपल्या मुलाला चांभार व्हायचं असेल तरीही चालेल असा सल्ला देतात. आपण मुलांना करियर निवडताना सांगतो की मोठ्या पैशाची नोकरी मिळाली पाहिजे किंवा मोठा ऑफिसर होता आले पाहिजे.. बापाच्या प्रतिष्ठान नुसार काम करियर निवड नाहीतर बापाचं नाक कापले जाईल.. खर तर लोकमान्य म्हणतात, प्रत्येक कामात प्रतिष्ठा असते ते काम मनापासून केलं तर त्या कामांमध्ये आपण टॉपला जाऊ शकतो... यशस्वी होऊ शकतो.
पुढचं वाक्य लोकमान्यांचं त्यांच्या मुलाला अतिशय महत्त्वाचे लिहितात. यामध्ये संपूर्ण करिअरचा सार आहे. लोकमान्य लिहितात, "मॅट्रिक नंतर तुला काय करायचं ते तू ठरव, चांभार व्हायचे तर चांभार हो पण चांभार झाल्यास तर जोडे उत्तम शिव की लोक दुनियेत म्हटले पाहिजे की उत्तम जोडे (चप्पल) शिवायची असेल तर टिळकांकडेच जा.. उत्तम जोडे शिवायचे तर टिळकांनीच."
लोकमान्यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितला, जे काम करशील ते अधिक उत्तम पद्धतीने कर. त्याच्यामध्ये स्वतःला झोकून दे. निवडलेल्या करिअरमध्ये इतके कष्ट घ्यायचे की आपल्याशिवाय तिथे कोणी पर्याय नसेल. करियर निवडताना इतका आत्मविश्वास स्वतःमध्ये असावा की ऐकतर मी रस्ता शोधल किंवा नवीन रस्ता बनवेल. जीवनामध्ये निवडलेल्या क्षेत्रांमध्ये उत्तमता, प्रतिभा आणि सृजनशीलता आणायची.
कुठलेही करिअर निवडा.. करिअर हे छोटं मोठं नसतात. त्या करिअरमध्ये उत्तमता, सृजनशीलता आणि सर्वात महत्वाचं त्या निवडलेल्या क्षेत्रांमध्ये त्या क्षेत्राची संपूर्ण खोल माहिती घेत जाणं हे जर गुण स्वतःमध्ये आणले तर त्यामध्ये आनंद आणि सोबतच पैसा हा येत असतो. लोकमान्य सांगतात त्यांच्या मुलाला जीवनात स्वतःला ओळखा आणि स्वतःला ओळखून मगच करिअरचं क्षेत्र निवडा.
त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क पडलेले आहेत त्यांनी निराश होऊ नये. मार्कंनवरून गुणवत्ता ठरत नसते. गुणवत्ता ठरते ती तुमच्या मध्ये जीवनाला सामोरे जाण्याचे काय गुण आहेत त्याच्यावरून.. आणि ते अनुभवातून येतच असतात. सृजनशीलता, निवडलेल्या क्षेत्रात अधिकाधिक माहिती घेत जाणे आणि मेहनत या तीन गोष्टी विद्यार्थ्यांनो तुमच्यात आणा मग करियर कुठलंही असू द्या..या तीन गुणामुळे त्या करिअरमध्ये तुम्ही टॉपला पोहोचू शकतात.
सचिन उषा विलास जोशी,
शिक्षण अभ्यासक
प्रत्येक पालकांनी वाचवा असा शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख
पालकत्व म्हणजे काय? मुलांना वाढवायचे म्हणजे नक्की काय करायचे? मुलांना बुध्दीमान कसे करायचे? सर्वात महत्वाचे मुलांचा मेंदू घडतो कसा? असे असंख्य प्रश्न आज स्त्रीयांना (आईंना) पडत असतात. या प्रश्नाचे आपण शास्त्रीय उत्तर शोधुया.
या शतकातला शिक्षणक्षेत्रामधला सर्वात मोठा शोध जर कोणता असेल तर तो म्हणजे बालकाचा मेंदू घडतो कसा?
मेंदू मानसशास्त्र सांगत की बाळ जन्मल्यापासून तर पहिल्या सहा वर्षापर्यंत बालकाच्या मेंदूची जडण-घडण सर्वात जास्त होत असते. या काळात बालकाच्या मेंदूच्या पेशीतील जुळणी चालू असते. ही पेशींची जुळणी जेवढी घट्ट, मजबुत आणि जेवढी अधिक होईल तेवढा बालकाचा मेंदू सक्षम बनेल.
सहावर्षापर्यंत ते बारावर्षापर्यंत सुध्दा मेंदूतील पेशींची जुळणी चालू असते. पण त्यांचे प्रमाण पहिल्या सहा वर्षात जेवढ्या अधिक प्रमाणात होते तेवढे सहा ते बारा वर्षाच्या टप्प्यामध्ये प्रमाण कमी असते.
म्हणजे आपल्या पाल्याला हुशार, बुध्दीमान बनवायचे असेल तर जन्मापासून ते पहील्या सहा वर्षाच्या हा पहिला टप्प्यामध्ये मेंदू मधील करोडो पेशींची कनेक्शन जुळणी दुसऱ्या सर्व पेशी बरोबर होणे आवश्यक आहे. पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे ६ ते १२ वर्षाच्या वयामध्ये सुध्दा मेंदूच्या पेशींची जुळणी होत असते. पण त्याचा विकास पहिल्या टप्प्यावर अवलंबून असतो. थोडक्यात जन्मापासून ते १२ वर्षापर्यंत बालकाच्या मेंदूचा विकास हा अधिक होत असतो.
आता हा विकास कसा होतो? मेंदूतील पेशींची जुळणी कशा मुळे होते? पालकत्वामध्ये काय काय बदल करावे लागेल जणे करून बालमेंदूची जडण घडण उत्तम होईल?
सर्वात पहिले आपण समजवून घेऊ की मेंदूच्या पेशींची जुळणी कशा मुळे होते? कारण जुळणी घट्ट व उत्तम झाली तर मेंदूचा विकास होणार आहे. अर्थात झाली तर मेंदूचा विकास होणार आहे अर्थात बालक बुध्दीमान बनणार आहे.
मेंदूच्या पेशींची बांधणी ही लहानपणी त्याला तीला मिळालेल्या अनुभवांवर अवलंबून असते. लहानपणी जेवढे विविध अनुभव पाल्यांना मिळतील तेवढे त्यांचे विविध क्षमतांचा विकास होणार आहे. जेवढे विविध अनुभव तेवढी विविध बुध्दीमत्तांचा विकास होण्याची शक्यता वाढते.
बालकाच्या पाच ज्ञानेंद्रीयांना विविध अनुभव मिळाले तर बालकाच्या मेंदूची जडण-घडण उत्तम रितीने होते. डोळे, कान, नाक, जिभ व त्वचाच्या माध्यमातून मुलांना विविध अनुभव मिळाले तर मेंदूतील पेशींना चालना मिळते व त्यांची जुळणी घट्ट होते. मुलांना कुठकुठले अनुभव देता येतील याच्या संदर्भासाठी काही ऍक्टीव्हीटी सुचवतो पण पालकांनी वया नुसार व त्यांच्या कलेनुसार यासारख्या असंख्य ऍक्टीव्हीटी पाल्याकडून करून घेऊ शकतात.
शारीरीक व भावनिक संवेदनाचा वापर करून मेंदूची कार्यक्षमता व त्याला चालना देता येते. उदा. पाल्यांना सांगणे डोळे बंद करून केसे विंचर, डोळे बंद करून कपडे घालणे, डोळे बंद करून आंघोळ करतांना डोके धुवायचे, एकाच वेळी क्लासिकल गाणे ऐकायचे आणि फुलांचा वास घ्यायाचा, पावसात भिजत पावसाचा आवाज ऐकत बोटांनी वेगळा आवाज करायचा, ढगाकडे बघत क्ले किंवा चिकनमाती घेवून वेगवेगळे आकार करायचे, न बोलता डोळ्यांनी आणि हातवारे करून बोलायचे अशा विविध ऍक्टीव्हीटी करून पाल्यांना कृतीशील करू शकता.
मुलांना हुशार बनवायचे असेल तर मुलांना भरपूर कृतीशील अनुभव द्या. घरात उत्साही वातावरण ठेवायचे. मुलांना सातत्याने चॅलेंज द्या. मुलांना विविध भाषेचें संस्कार दया. सातत्याने संगित ऐकायला द्या. मुलांची कल्पना शक्ती वाढवायची असेल तर आईने पाल्यांना रोज एक तरी गोष्ट सांगायला हवी. जेव्हा आई मुलाला मांडीवर घेवून थापडते, प्रेम करते, जवळ घेवून गोष्ट सांगते तेव्हा आईच्या स्पर्शाच्या संवेदना मुलांसाठी अविस्मरणीय असतात. अशा संवदेनामधील ऑक्सिटोसीन नावाचे हार्मोन्स स्त्रावते.
शिक्षणतज्ञ रमेश पानसे सांगतात, या होर्मोन्सचा व्यक्तिच्या स्वभावावर खूप मोठा परीणाम होतो. ऑक्सिटोसीन हार्मोन्स असल्यामुळे विश्वासाचे नाते प्रस्तापित होते. जर शरीरामध्ये ऑक्सिटोसिनचे प्रमाण बरोबर असेल तर व्यक्ती विचारी, शांत व विश्वासू स्वभावाची बनु शकते. या उलट जर ऑक्सिटोनीचे प्रमाण कमी असेल तर व्यक्ती चिडचिडी, संतापी व संशयी बनते. म्हणून आईचा दररोजचा प्रेमाचा स्पर्श जवळ मांडीवर घेऊन गोष्टी सांगणे आवश्यक आहे.
मुलांची निरक्षणक्षमता विकसीत करण्यासाठी मुलांचे व्हिज्युअल कॉन्टॅक्स विकसीत होणे आवश्यक आहे. लहानपणी जितक्या गोष्टींचा अनुभव डोळ्यांना येईल तेवढे व्हिज्युअल कॉरटेक्स पेशी उत्तेजित होत असतात.
त्यासाठी जाणिवपूर्वक मुलांना बाहेरचे जग दाखवा. झाडे, पक्षी, घरे, रस्ते, खेळणारी मुले, येणारी जाणारी वाहने, वेगवेगळयारंगाचे कपडे, नक्षीकाम, रंगकाम अशा विविध गोष्टी मुलांना तीन वर्षापर्यंत दाखवा. गोष्टी दाखवतांना मुलांना प्रश्न विचारुन निरक्षण करायला सांगा. उदा. दोन वर्षाच्या मुलाला गाय दाखवली तर त्याला विचार गाय कशी बघते, शेपटी कशी हलवते व कशी चालते, पोळी कशी खाते? तुला काय म्हणाली का? अशा पध्दतीने प्रश्न विचारले तर बरोबरच मुलांची निरक्षण क्षमता नक्कीच वाढते. मी तुम्हाल एक उदाहरण दिले, तुम्ही या पध्दीने जत्रेमध्ये, बाजारामध्ये सन-वार विविध कार्यक्रम यापध्दतीने निरीक्षण करायला लावू शकता.
मुलांना मनमोकळी मस्ती करू द्या. त्यासाठी शक्यतो जमीनीवर गादी टाकून झोपा. बेडवर मस्ती केली तर पडण्याच्या भितीने आपण त्यांना सतत रागवत असतो. मुलांना रोज संध्याकाळी जवळच्या गार्डनमध्ये, मैदानावर किमान दोन तास खेळायला पाठवणे गरजेचे आहे. यावयात शारीरीक वाढ सर्वात जास्त होत असते. आणि त्यासाठी घाम येईपर्यंत खेळणे गरजेचे आहे. पण आजकाल मुलं संध्याकाळी टीव्ही समोर असतात किंवा ट्युशला तरी असतात. यामध्ये अमुलाग्र बदल होणे आवश्यक आहे.
आजकाल विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर चांगले नसते त्यांना लिहीण्याचा कंटाळा येतो त्याचे मुख्य कारण पहिल्या सहा वर्षामध्ये त्यांच्या हातांच्या बोटांचे फाईन-ग्रॉस मोटार डेव्हलपमेंट व्यवस्थित झाले नसतात. त्यासाठी मुलांना घरची सर्व कामे करु दया. झाडू मारायला द्या, पीट मळायला द्या, फरशी फडक्याने साफ करायला द्या. त्यांना त्यांचे कपडे धुवायला द्या. हाताच्या बोटांनी फळे सोलायला द्या, कुंडीमध्ये झाडांना पाणी टाकू द्या अशी छोटी मोठी कामे मुलांनी करणे गरजेचे आहे.
प्रत्येक अनुभव हा पाच ज्ञानेंद्रियातून जाणे आवश्यक आहे. जसे कान! मुलांना विविध संगीत ऐकवा, मुलांना विविध अर्थपूर्ण आवाज ऐकवा, डोळे बंद करुन विविध भांड्याचा आवाज ओळखायला द्या.
जसं कानाचे अनुभव तसेच जिभेचे अनुभव द्या, त्यांना सर्व प्रकारच्या चवी ओळखायला द्या, मुलांना स्पर्श ज्ञान द्या त्यासाठी वेगवेगळे सरफेसला हात लावू द्या. ग्रॅनाईट, मार्बल, टाईल्स, लाकूड, शहाबादी फरशी, दोरी यांच्यामधील स्पर्शातील फरक ओळखणे, कागदाचे, कापडाचे वेगवेगळे मटेरीअल ओळखणे, द्रव सुरुपातील केरोसीन, ऑईल, दुध, पेट्रोल यांचे स्पर्श हाताला कसा जाणवतो. वेगवेगळी झाडांची पाने जसे की, ओले पान, सुकलेले पान, मोठे-छोटे पानं, वडाची, पिंपळाची, केळीची पानं या सर्वांच्या स्पर्शाचा अनुभव लहानपणीच द्या.
यातून मुलांच्या मेंदूच्या पेशींना चालना मिळते, तो/ती जसे मोठे होतील तेव्हा त्यांना सांगितले की, हे केळीचे पान आहे तर त्याला फक्त माहिती मिळेल, पण मेंदू जडण घडण काळात दाखवले, स्पर्श करू दिला तर त्याच्या मेंदूतील पेशींची जुळणी होते.
मुलांना विविध वास ओळखायला द्या. वेगवेगळ्या फुलांचा सुंगधापासून तर विविध अंतरापर्यंत सर्व वास नाकाला जाणीव पूर्वक घेवू द्या. किचन हे सर्वात उत्तम घरामधली शाळा आहे. स्वयंपाक खोलीमध्ये मुलं विविध गोष्टी शिकू शकतात.
थोडक्यात काय तर विविध अनुभवांनी पाल्याला घडवा. भरपुर किल्ले दाखवा, निसर्ग दाखवा, शेतामध्ये काम करू द्या, नदीचा पुर दाखवा, भाजी-मंडई मध्ये घेऊन जा, मानसिक अभिव्यक्ती होण्यासाठी भरपूर चित्र काढायला द्या, मुलांना भरपूर नाटके दाखवा, व्यवहार ज्ञान द्या, या अन् अशा प्रकारच्या कितीतरी गोष्टी तुम्ही करु शकतात. पण आजकाल पालकांनकडे वेळ नसतो. स्वत: पालकच ताण-तणावा खाली वावरत असतात. सातत्याने घाई व त्यातून होणारी चिडचिड हे या सर्व गोष्टी मुलं तुमच्याकडून शिकत असतात. आपण कसेही असलोतरी आपण आपल्या मुलांसाठी आदर्श असतो.
आपलं वागणं हेच संस्कार असतात. मग आपण लहानमुलांशी कसं वागतो. नेहमी वैतागलेलो, कंटाळलेलो तर मग ते आपल्याकडून हेच शिकणार, आजकाल मुलं खूप लवकर बोर होतात. जर आपले पालकत्त्व अनुभव संपन्न असले तर मुलं बोर होणार नाहीत. आणि त्यांचा शारीरीक, मानसिक व बौध्दिक विकास उत्तम होईल. बाळाचे पहिले सहा ते आठ वर्ष अत्यंत महत्त्वाचे असतात. ह्या वयात पाया भरला जात असतो. पण पालक पाया भक्कम करण्याकडे दुर्लक्ष करतात आणि मोठं झाल्यावर कळस बांधण्याकडे वेळ देतात. पालकांनो पाया भक्कम असेल तर मंदिर भक्कम बनते आणि सुंदर कळस बांधला जातो.
आता आपण निट विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल वरील सर्व अनुभव पुर्वीच्या काळी एकत्र कुटुंबात सहज होत होते. पण संस्कृती बदलली. टिव्ही मोबाईल बघण्याचे प्रमाण वाढले. विभक्त पध्दत उदयास आली आणि मुलांना हे अनुभव मिळणे कमी झाले. या जमाण्यात मुलांना मिळतात ते फक्त मॉल संस्कृतीचे अनुभव. टच स्क्रिनचे अनुभव, सर्वच गोष्टी डिजीटल झाल्याने मुलांच्या मेंदू विकासासाठी लागणारे खाद्य कमी होत चालले. सातत्याने टीव्ही, मोबाईल गेम, व्हिडीओ गेम यामधुन मुलांन मध्ये विविध आजार निर्माण होत चालले. जसे ए. डी. एच. डी हॅपर ऍक्टिव पणा वाढत चालला आहे. मुलांमध्ये एकाग्रता समस्या वाढताय. फास्ट फुड मुळे मुलांमध्ये आरोग्य समस्या निर्माण होत आहे हे सर्व पालकत्वांची संस्कृती मध्ये बदल होत असल्याने झाले आपले आजी-आजोबा मुलांना मन मोकळ्या पध्दतीने वाढवायचे सुचविलेल्या ऍक्टिव्हीटी एकत्र कुटुंबात सहज होत होत्या.
आज मी प्रयोगशील शाळा चालवतो, यापैकी सर्व ॲक्टीव्हीटी अनुभव मुलांना जाणीवपूर्वक देत असतो. हे सर्व अनुभव शाळा आणि घरातून सातत्याने होणे आवश्यक आहे
आजही ग्रामीण भागातील मुलांना उच्च शिक्षण मिळाले तर ते मोठे व्यावसायिक, अधिकारी होेतात. भारतातील बहुतांश आय. एस. एस. अधिकारी, कलेक्टर हे ग्रामीण भागातून असतात. कारण लहानपणी ते निसर्गात वाढतात, शेतात खेळतात, मातीशी नाळ जोडली असते. शास्त्र सांगते त्यांच्या मेंदूची जडण घडण उत्तम झाली असते. हेच शहरातील मुलांना कुठलेही अनुभव मिळत नाही. ते फक्त पुस्तकी ज्ञानावर अवलंबून असतात. थोडक्यात आपल्याला पालकत्वाच्या मुळ संस्कृतीकडे येणे आवश्यक आहे. आपलं पालकत्व अनुभवसंपन्न असेल तर येणारी पिढी ही उत्तम घडेल.
सचिन उषा विलास जोशी
शिक्षणअभ्यासक
(पोस्ट शेअर करू शकता)
सचिन उषा विलास जोशी यांचा शिक्षक दिना निमित्त सकाळ वृत्तपत्रातील लेख.
आज शिक्षक दिन आहे. पाच सप्टेंबरच्या दिवशी शिक्षक किती महान असतात या बद्दल शाळेपासून ते सोशल मिडीयापर्यंत सर्वांकडे चर्चा आता होईल. आपला भारतीय संस्कृती मध्ये गुरुचे शिक्षकाचे खूप महत्व पण आहे. प्रश्न हा आहे रोजच्या जीवनामध्ये आपण शिक्षकांना तेवढे महत्व देतो का? शिक्षकांना तेवढा सन्मान मिळतो का?
आपण रोजच्या जीवनात शिक्षकांना आदराने वागवतो का? जर हा प्रश्न आपण स्वत:ला विचारला तर प्रामाणिक उत्तर येईल ते म्हणजे ‘नाही’. आपण शिक्षकीपेक्षाकडे तीतके सन्मानाने पाहत नाही. जो डॉक्टर, इंजिनिअर, सि.ए., वैज्ञानिक घडवतो त्या शिक्षकाला संपुर्ण आयुष्यात शिक्षक दिनी फक्त दोन थँक्युचे शब्द मिळतात.
हे वाचल्यानंतर आपण मनात विचार करत असाल की आता शिक्षक त्या दर्जाचे राहिले नाही वगैरे वगैरे. मला असे वाटते प्रश्न दर्जाचा नसून सन्मानाचा आहे.
हल्ली विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांविषयी ना प्रेम दिसते ना पालकांच्या मनात. संस्थाचालकांना वाटते शिक्षक म्हणजे आपले नोकरच आहेत. हवे ते काम सांगा. राजकारणांना वाटते शिक्षक म्हणजे मोठी वोट बँक, आपले सर्व राजकारणातील कामे सांगायची हक्काचे व्यासपीठ. सरकारला वाटते कुठल्याही योजना आमलात आणायच्या असेल तर ‘बीन पगारी फुल अधिकारी’ म्हणजे शिक्षक. आजकाल आपण शिक्षकांना एवढे कामात अडवले आहे की तो/ती शिकवायचेच विसरुन गेला आहे. याचे कारण एवढेच की, आपला देश शिक्षकांना सन्मानाने वागवतच नाही.
ज्या देशात शिक्षकांचा सन्मान होत नाही त्या देशाचे भवितव्य धोक्याच्या उंबरठ्यावर असते. आपल्याकडे जेव्हा शिक्षक राष्ट्रपती होतो. तेव्हा त्याचा सन्मान होतो. मला वाटले जेव्हा एक राष्ट्रपती प्राथमिक शिक्षक होईल तेव्हा खरा शिक्षकाचा सन्मान समजावा.
आजकाल खाजगी शाळेमध्ये पालकांचा अॅटिड्युड असा असतो की, मी फी भरतो म्हणजे शाळेवर उपकार करतो आणि शिक्षकांना तर विकतच घेतले आहे. एखादी नजर चुकीने शिक्षकांकडून चूक झाली तर पालक मुलांदेखील शिक्षकांना झापतात. अशा वागण्याने मुलांच्या मनावर शिक्षकांबद्दल आदर राहिल?
खाजगी अनुदानित शाळेत शिक्षकांना संस्थाचालकांच्या मर्जीने हाजी-हाजी करत वागावे लागते. तसे वागले नाहीतर सर्वांसोबत बिचार्याची लायकी काढली जाते. सरकारी शाळेतील शिक्षकांना तर नेहमीच टिकेचे धनी व्हावे लागते. जगात काही चुकीचे घडले तर त्याला तोच जबाबदार असतो.
कुठेही शिक्षकांना आदराने, सन्मानाने वागविले जात नाही. राजकारण्यांपासून ते विचारवंतापर्यंत, विचारवंतापासून ते साहित्यकांपर्यंत सर्वच जण शिक्षकांना अक्कल शिकवत असतात. पण तो एक माणुस आहे, त्याच्यावरपण चांगले वाईट संस्कार झाले आहेत, कोणीही त्याची मानसिक स्थिती समजवून घेण्याच्या परिस्थीती मध्ये नसतो.
कारण आपण सर्वजण शिक्षकांना सन्मान देण्याऐवजी “शिक्षण सम्राटांना” सन्मान द्यायला लागलो आहे.
संगणकामध्ये हार्डवेअरपेक्षा सॉफ्टवेअरला जास्त महत्त्व आहे. पण आपण सन्मान हार्डवेअरला देतो. त्यामुळे सॉफ्टवेअरमध्ये व्हायरस खुसला तर तो क्लिन करण्याकडे आपल्याला रस नसतो आणि मग आपण शिक्षकांच्या नावाने खडे फोडतो पण त्यांची मानसिकता विधायक कशी बनेल यावर खोलात जावून कधी विचार करत नाही.
शिक्षकांना सन्मानाने वागणूक नाही मिळाली तर काय होते ते आपण पाहू. जेव्हा आपण सर्वजण संस्थाचालक,पालक, एकूण समाज यांनी जर शिक्षकांना सन्मानाने वागविले नाही तर विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांबद्दल आदर राहणार नाही. जेव्हा विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांबद्दल आदर, प्रेम निर्माण होत नाही किंवा कमी होतो तेव्हा विद्यार्थ्यांच्या मनाचे दारे शिक्षकांबद्दल बंद होतात आणि मग ते शिक्षक कितीही जीव ओतून शिकवत असले तरी त्यांच्या डोक्यात काही शिरत नाही. कारण कळत नकळत त्यांच्या मनाची दारे बंद असतात.
तेच जर विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांबद्दल आदर प्रेम असेल तर त्याने जसे शिकवले ते त्याच्या मनात शिरते कारण मनाची दारे उघडी असतात. शिकणे-शिकवणे ही मानसिक प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया तेव्हाच घडते जेव्हा विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये एक अतुट बंधन असते. त्यासाठी शिक्षकांना सन्मानाने वागणूक दिली पाहीजे. कारण तो/ती समाज देश घडवत असतो. फक्त ते दृश्य स्वरुपात आपल्याला दिसत नाही.
जेव्हा शिक्षकांना सन्मानाने वागणूक मिळेल शिक्षक आपोआप जबाबदारीने अध्यापनाचे कार्य करतील. शिक्षकांना आर्थिक स्वरुपाच्या सोयी-सुविधा कमी देत असाल तरी चालेल पण त्यांना चार-चौघात आदर मिळायला हवा.
आजकाल शिक्षक असेल तर लग्नाला लवकर मुलगी सुध्दा मिळत नाही. मला वाटते जो पगार कॉलेजमध्ये प्राध्यापकाला मिळतो तो पगार प्राथमिक/पुर्व प्राथमिक शिक्षकांना मिळाला पाहिजे आणि याउलट पुर्व-प्राथमिक शिक्षकांचा पगार प्राध्यापकांना द्यायला हवा. कारण पाया रचणारा महत्वाचा असतो, कळस बांधणारा नाही.
संपूर्ण व्यक्तिमत्वाचा पाया पहिल्या बार्या वर्षाच्या आत रचला जातो. लहानपणी मिळालेल्या अनुभवांवरच मुलांचे भावनिक आणि मानसिक स्वास्थ भविष्यात ठरत असेत. मग पुर्व-प्राथमिक शाळेत शिकवणारे शिक्षक हे उत्तम व्यक्तिमत्वाचे, विधायक मानसिकतेचे हवे. त्यासाठी या शिक्षकांचे योग्य कौतुक होणे, सन्मान होणे आवश्यक आहे. जणे करुन त्यांना अध्यापनाच्या कार्यात प्रोत्साहन मिळेल. त्यांना स्वत:मध्ये सातत्याने बदल करावसा वाटेल.
त्यासाठी समाजानं आपल्या बोलण्या-वागण्यात शिक्षकांना सन्मान द्यावा लागेल. सोशल मिडीयावरील टिचर्स जोक बंद व्हायला हवे. एका दारुच्या कंपनीनेच व्हिस्कीचे नांव ‘टिचर्स’ ठेवल. त्यावर बंदी यायला हवी. पालक सभेमध्ये पालकांनी शिक्षकांशी बोलतांना नम्रपणा ठेवला पाहीजे. राजकरण्यांनी शिक्षकांचा वापर स्वत:च्या सोयीसाठी करणे थांबले पाहिजे. सरकारी अधिकार्यांनी शिक्षकांना अरे-तुरे ची भाषा बंद केली पाहिजे.
आज असे चित्र आहे की, सर्व ठिकाणी नोकरीचा अर्ज दिला आणि कुठेच नोकरी नाही मिळाली की, मग शेवटचा अर्ज शिक्षक होण्यासाठी असतो. मग शिक्षकाची नोकरी लागली की, पार्ट टाईम बी.एड. चा अभ्यासक्रम पुर्ण केला जातो. आपल्या देशात सर्वात शेवटचा करीअर मार्ग ‘शिक्षकी पेशा’ कडे पाहिले जाते आणि जपानमध्ये पहिले करीअरची पसंती टिचर्स होण्यासाठी असते.
जपानमध्ये शिक्षक होण्यासाठीची पात्रता परीक्षा ही भारतातल्या आय.ए.एस. परीक्षेच्या समानतेची असते. जपान नागरीक ती परीक्षा पास होऊ शकला नाही तर त्याला खुप वाईट वाटते किंबहुना तो रडतो कि मी शिक्षक होऊ शकलो नाही, शिक्षक होण्याची पात्रता माझ्यात नाही. ही भावना नागरीकांमध्ये येण्याचे कारण जपानमध्ये सर्वात जास्त सन्मान आणि आदर शिक्षकांना आहे.
अशा करु भारतात राजकारणी, सरकारी अधिकारी, संस्थाचालक, पालक आणि सर्व समाजच शिक्षकांना आदराने वागवेल. एक पुरस्कार आणि शिक्षक दिन सोहळे फक्त यांनी सन्मान मिळणार नाही तर आपल्या वागण्याबोलण्यातून प्रत्येक शिक्षकांसाठी यायला पाहिजे.
जेव्हा हा सन्मान येईल तेव्हा सारा देश शिक्षकांकडे आशेने पाहिले, त्यांच्या कार्याला रोज सलाम करेल, मुलांच्या स्वप्नांना भरारी देणारा कलाम शिक्षकांत पाहिल.
सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक
शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्र मधील लेख
जादू कि झप्पी हा डायलॉग मध्ये खूप गाजला. मुन्नाभाई एमबीबीएस या फिल्ममध्ये संजय दत्त जो कोणी अडचणीमध्ये असतो त्याला जादू की झप्पी देतो.
एक मैत्रीपूर्ण मिठी म्हणजेच जादू कि झप्पी लहानपणी मुलांना मिळणे गरजेचे असते. ती जर मिळाली नाही तर मोठ्यापणी व्यक्तिमत्त्वामध्ये काही दोष निर्माण होण्याची शक्यता असते.
लहानपणी पालकांचा मायेचा स्पर्श मुलांना सातत्याने मिळणे निकोप वाढीसाठी अत्यंत गरजेचे असते. तुम्ही म्हणाल, आम्ही पालक आमच्या लहानग्याला नेहमी कडेवरच घेत असतो. नेहमी त्यांना मायेची ऊब मिळत असते. पण लहान म्हणजे फक्त एक ते दोन वर्षांची मुले नाही. आपले मुलं दहा-बारा वर्षाचे होईपर्यंत जादूची झप्पी देणे आवश्यक आहे.
जेव्हा आई, आजी मुला-मुलींना त्यांच्या नातवंडांना मांडीवर घेऊन थोपटत असते किंवा त्यांना जवळ घेऊन गप्पागोष्टी करत असते तेव्हा आईच्या स्पर्शाची संवेदना ही मुलांसाठी अविस्मरणीय असते. अशा स्पर्शातून अर्थात संवेदनेमधून ऑक्सिटोसिन नावाचे हार्मोन स्त्रावते.
या हार्मोनचा भविष्यात व्यक्तीच्या स्वभावावर खूप मोठा परिणाम होतो. ऑक्सिटोसिन हार्मोनचे काम विश्वासाचं नातं प्रस्थापित करणे असते.
लहानपणी मुलांना मायेची ऊब किती मिळाली आहे, त्याला किती प्रेमाने मांडीवर घेऊन डोक्यावरून हात फिरवला आहे, त्याला किंवा तिला किती मिठीमध्ये घेऊन स्पर्शाने प्रेम माया दिली आहे त्यावर हे प्रमाण अवलंबून असते.
जर शरीरामध्ये ऑक्सिटोसिन प्रमाण बरोबर असेल तर ती व्यक्ती विचारी, शांत व सर्वात महत्वाचे विश्वासु स्वभावाची बनू शकते आणि याउलट जर हे प्रमाण कमी असेल तर ती व्यक्ती चिडचिडी, संतापी आणि सर्वात महत्त्वाची संशयी वृत्तीची बनू शकते. जेव्हा मोठेपणी व्यक्ती खूप संशयी वृत्तीची असते तेव्हा समजावं लहानपणी त्याच्या मेंदूत ऑक्सिटोसिन चे प्रमाण कमी निर्माण झालं याचाच अर्थ आई वडिलांचा, आजी-आजोबांचा प्रेमाचा स्पर्श कमी उपलब्ध झाला.
पुढे संशयी वृत्तीच्या माणसाबरोबर ऍडजेस्ट करणे खूप कसरतीचे असते. जगात सर्वांवर औषध आहे पण पॅरानिया म्हणजेच संशयी वृत्ती वर नाही. मला सांगा कोणाला नाना पाटेकर ची भूमिका असलेला अग्नी साक्ष फिल्म मधला नवरा आवडेल?.. जो मनीषा कोइराला बाजारात गेल्यावर विचारतो, "बोलो इतना वक्त लगता है क्या.."
संशयी लोकांबरोबर व्यावसायिक व्यवहार करणे सुद्धा कटकटीचे होते. हेच जी व्यक्ती सातत्याने विश्वासास पात्र असते, दुसऱ्यांवर नेहमी विश्वास ठेवते आणि विश्वासू स्वभावाची असते तिच्याबरोबर नातेसंबंध उत्तम राहतात. हे सर्व अवलंबून असते मेंदूमध्ये ऑक्सिटोसिन चे प्रमाण किती आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा लहानपणी मुलांना किती प्रेमाने मायेने स्पर्श केला आहे त्यावर अवलंबून असते. आई जेव्हा बाळाला जवळ घेऊन दूध पाजते तेव्हा याचे प्रमाण सर्वात जास्त वाढत असते. मग मुलगा मुलगी जसजशी मोठी होत जातात तस तसे पालक त्याला किती जवळ घेऊन आनंदी रिलॅक्स वातावणात घेऊन बसतात त्यावर अवलंबून असते.
आपण मुलं नर्सरी ज्युनिअर केजी मध्ये असेपर्यंत म्हणजेच चार पाच वर्षाची असेपर्यंत मुलांना जवळ घेऊन बसतो आणि मायेचा विश्वासाचा स्पर्श देतो पण सहा सात वर्षाची झाल्यानंतर हे प्रमाण कमी होते आणि मुलं जशी दुसरी तिसरी ला आले की ते पूर्ण थांबते.
पालकांनी मुलांना रोज एक तरी मिठी मारावी, डोक्यावर हात फिरवून विचारपूस करावी. या वयातच ऑक्सिटोसिन चे प्रमाण वाढते आणि मुलं 10-12 वर्षाची झाली की हे प्रमाण अत्यंत अल्प होत असते.
पालकांनो मुलं शाळेत जातांना किंवा घरी आल्यावर एक तरी जादूची झप्पी द्या. मुलांना मोकळ्या वातावरणात जवळ घेऊन गप्पागोष्टी करा आणि संवेदनाक्षमता वाढवा. संवेदना क्षमतेतुनच विश्वासू स्वभावाचे भविष्यातील नागरिक बनतील. आपल्याला विद्यार्थ्यांचा I.Q पेक्षा E.Q वाढवायचा आहे. शिक्षकांची पण तेवढीच जवाबदारी आहे.
सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक
शिस्त आणि विद्यार्थी
शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा शिस्त आणि विद्यार्थी यावरील लेख.
विद्यार्थ्यांना घडवण्यात शिक्षकांची मोठी भूमिका असते. काळानुसार या भूमिका बदलत जातात. भूमिका जशा शिक्षकांच्या बदलत जातात तशा पालकांच्या सुद्धा. *बराच वेळा शिक्षक पालक यांच्या नात्यांवर विद्यार्थ्यांची प्रगती अवलंबून असते.*
५० वर्षांपूर्वी गुरुजी विद्यार्थ्यांवर मेहनत घ्यायचे. विद्यार्थ्यांना झोडपले मारले तरी पालक शिक्षकांना काही बोलायचे नाही, उलट विद्यार्थी आई - वडिलांना सांगायचे नाही की आज शाळेत मला शिक्षा झाली किंवा मला मारले कारण वडिलांचा अजून मार बसायचा. तुला शिक्षा झाली म्हणजे तू चुकलाच असेल ही धारणा पक्की होती. याचा परिणाम असा झाला होता की शिक्षकांबद्दल भीतीयुक्त आदर होता. *शिक्षक हेच सुधारण्याचे प्रवेशद्वार यावर पालकांची श्रद्धा होती*. त्या काळात शिक्षक ही तसेच होते म्हणा. . अशा शिक्षकांमुळे आपण सारे घडलो, आयुष्यात येणाऱ्या समस्या या आपल्यालाच स्वतःला सोडवायच्या असतात. . आपले आई-वडील शाळेत येऊन शिक्षकांशी बोलणार नाही, समस्या सोडवणार नाही. . यामुळे नियमबाह्य कामच करू नका. .चुकीचे गैरवर्तन करू नका. . हे शिक्षकांच्या धाकामुळे शक्य झाले जे पुढे आयुष्यात नोकरी-व्यवसाय करताना खूप उपयोगी पडले.
शाळेतील नियम पाळल्यामुळे ऑफिसमध्ये वेळेवर जाण्याची सवय लागली.
आजकालचे पालक विद्यार्थ्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीं मधे नाक खुपसून शिक्षकांशी चर्चा (वाद) करायला येतात आणि ही चर्चा चालते त्या मुलानं देखत. जिथे मुलांच्या मनाला समजते की आई-वडील हे आपल्या प्रत्येक समस्या सोडतील (समस्या या समस्या नसून बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचे गैरवर्तन असते पण ते त्याला कधीच मान्य नसते.) आई-वडील आपल्या वर्तुणुकीला सपोर्ट करता बघून त्यांचे सुधारण्याचे मार्ग हळूहळू कमी होत जातात. हे त्या मुलाला समजत नसते किंबहुना हे समजण्याचे वयच नसते पण पालकांना समजत असते पण आंधळा प्रेमापोटी ते समजण्याची मनस्थिती नसतात.
50 वर्षांपूर्वीचे शिक्षक हे खरे गुरुजी होते. त्यानंतर गुरुजी हळूहळू कमी होत त्यांच्यातले उरलें कडक शिक्षक. .
या कडक शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. याचा परिणाम असा झाला की अतिसंवेदनशील विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होऊ लागला.
1990 नंतरच्या म्हणजेच पंचवीस तीस वर्षांपूर्वी चे शिक्षक होते त्यांच्याकडून अति कडक शिस्त आणि शिक्षा यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान काही प्रमाणात सुरू झाले.
याच दरम्यान ग्लोबलायझेशन नुकतेच आले होते. पालकांची मानसिकता बदलत होती.. भौतिकवादाकडे आपण चालायला सुरुवात झाली आणि अतिमहत्त्वकांक्षा, हव्यास अशी चुकीची मूल्य समाजात रुजायला लागली.
*पास-नापास यांचा गंभीर प्रश्न समाजासमोर यायला लागला.* नैराश्यातून दहावीच्या विद्यार्थ्यांचे आत्महत्या प्रमाण वाढले. "शालेय परीक्षेत नापास म्हणजे आयुष्यात नापास", या एका विचारामुळे विद्यार्थ्यांन मध्ये आत्महत्या नैराश्य वाढत गेले. मला आठवते 2000 साली मी महाराष्ट्रभर शाळा-शाळांमध्ये प्रेरणादायी भाषांन द्यायचो. . उद्देश एवढाच होता की मुलांमधील आत्महत्येचा विचार त्यातून निघून जावा.
याच दरम्यान शिक्षणाचा कायदा आला. यामध्ये शिक्षकांना विद्यार्थ्यांना मारणे, शिक्षा करणे हा गुन्हा ठरवला. आठवीपर्यंत नापास करता येणार नाही अशा तरतुदी आल्या. यामुळे कडक शिक्षकांच्या मानसिकतेमध्ये हळूहळू बदल झाला. बरेच शिक्षक रिटायरमेंट स्टेजलाच होते. 2001 नंतर शिक्षकांची नवी तरुण पिठी यायला लागली. पण या दरम्यान पालकांच्या मानसिकतेमध्ये फार बदल झाला होता. येत्या दहा वर्षांमध्ये भौतिकवाद प्रचंड समाजात रुजला. *जिंकणे हेच सर्वस्व मग भले ते कुठल्याही मार्गाने मिळो हा संस्कार पालकांमध्ये घट्ट रुजला* आणि त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर झाला. पालकांमध्ये आपल्या मुलाबद्दल अति महत्त्वाकांक्षा निर्माण झाल्या. एकुलते एक बाळ. . त्याला हव्या त्या गोष्टी पुरवणे. . त्यांची प्रत्येक मागणी पूर्ण करणे.. हे पालकांचे आद्य कर्तव्य झाले. याच दरम्यान पालक आणि विद्यार्थी सोशल मीडिया, मोबाईल, टीव्ही या सर्व गोष्टीत अडकले. मैदानी खेळ नाही, अति स्क्रीन टाइम यातून मुलं हट्टी बनत गेली. *मागितले तर मिळते हा संस्कार अधिक रुजला.* चंगळवादामुळे पालकांमध्ये मूल्य-संस्कार याचे महत्व कमी झाले. याचा महत्त्वाचा परिणाम शिक्षकांबद्दलचा सन्मान कमी झाला. *प्रत्येक गोष्ट पैशाने विकत घेतली जाते अशा खोट्या समजुतीमुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान व्हायला सुरुवात झाली.* अति लाडा मुळे म्हणा किंवा अतिमहत्त्वाकांक्षी मुळे म्हणा किंवा शिक्षण कायद्याचा गैरवापर म्हणा पालक छोट्या-छोट्या कारणांसाठी शिक्षकांशी वाद घालू लागले.
आईने मुलाच्या संपूर्ण अभ्यासाची जबाबदारी स्वीकारली. १०० पैकी १०० मार्कांसाठी मुलांच्या अभ्यासाच्या चुकांपासून शिक्षकांच्या चुका काढण्यापर्यंत सर्व ती आई करू लागली. *पालकांच्या व्हाट्सअप ग्रुप वर फक्त शिक्षक कसे चुकीचे होते आणि माझी मुलगी.. माझा मुलगा कसा योग्य आहे आणि तो/ती कधीच खोटे बोलत नाही यावरच चर्चा रंगू लागल्या.* येत्या १० वर्षातील शिक्षकांना वर्गामध्ये क्लास कंट्रोल करणे कठीण होऊ लागले. ADHD, Learning Disabilities, Lack of Concentration यासारख्या समस्यांचे प्रमाण वाढले. वर्गातील दोन-तीन टग्या मुलांमुळे अख्खा वर्ग डिस्टर्ब राहू लागला. *त्यात हायपरऍक्टिव्ह मुलांच्या समस्या वेगळ्याच होत्या. त्या हाताळायच्या कश्या हा शिक्षकांसमोर प्रश्न पडला.*
शिक्षण कायदा चा गैरवापरा मुळे विद्यार्थ्यांना मारणे सोडा साधे रागावणे कठीण होऊन बसले. शिस्त लावण्यासाठी शिक्षा द्यावी तर काय द्यावी हा प्रश्न पडला. वर्गाच्या बाहेर काढले तर पालक भांडायला येतात की तो/ती वर्गाच्या बाहेर राहिल्याने तिचे शैक्षणिक नुकसान झाले. वर्गात उभे केले तर पालक ओरडतात की त्याच्या मानसिकतेवर परिणाम झाला, आता तो शाळेत यायला नाही म्हणतो.
कान पकडून उठाबशा काढायला सांगितले तर पालक दुसऱ्या दिवशी मेडिकल सर्टिफिकेट घेऊन येतात.
खूप त्रास देतो म्हणून कुठल्या ऍक्टिव्हिटी मधून काढून टाकले तर लगेच पालक म्हणतात आम्ही फी भरली आहे त्याला ॲक्टिव्हिटीमध्ये घ्या. तशी स्कूल डायरी मध्ये नोट्स येते. टीचर ने त्याच्याशी बोलणे सोडले तर पालक लगेच म्हणतात पाहू टीचर किती दिवस बोलत नाही तुझ्याशी. . तू स्वतःहून बोलू नकोस. . प्रिन्सिपल ला सांगून तिला तुझ्याशी बोलायला मी भागच पडते.. अशी कशी टीचर बोलत नाही पाहू.
म्हणजे मुलांना शिस्त लावण्यासाठी शिक्षा द्यायचीच नाही पण शिस्तीची अपेक्षा शाळेकडून नेहमी ठेवायची. *विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य मिळत असेल तर त्याबरोबर कर्तव्य सुद्धा पूर्ण करायचे असतात, जवाबदारीसुद्धा पाळायची असते याचा संस्कारच आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजत नाही.* शिक्षक हे सुधारण्याचे प्रवेशद्वार असते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रेम आणि स्वातंत्र्य देऊन त्यांची मनं जिंकायची असतात पण हे करण्याचा प्रक्रियेमध्ये शिस्त लावण्यासाठी काही अधिकार शिक्षकांना सुद्धा लागतात. मारणे, जबर शिक्षा करणे हे अघोरीच आहे जे केव्हाच कालबाह्य झाले आहे आणि आजकालचे शिक्षक याला समर्थन पण नाही करणार पण सध्याच्या काळात साधे रागावणे, विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी छोट्या-छोट्या शिक्षा करणे सुद्धा पालकांच्या दबावापोटी बंद झाले आहे. याचा विद्यार्थ्यांवर दूरगामी खूप वाईट परिणाम होतो. *विद्यार्थ्यांना अपमान पचवण्याची मानसिक धैर्य राहत नाही.* अशी विद्यार्थी तरुणपणी लवकर नैराश्याच्या विहिरीत पडतात. मला कोणी रागवत असेल तर ते माझ्या फायदे साठी आहे. . कुठलीही शिक्षक आनंदासाठी, काट काढण्यासाठी, दुसऱ्याचा राग विद्यार्थ्यांवर काढण्यासाठी विद्यार्थ्याला रागवत नसते. *ती रागवते याचा सरळ अर्थ विद्यार्थी कुठेतरी चुकतो आहे पण विद्यार्थ्यांची धारणा होऊन जाते की मला कोणीही रागवू नये ओरडू नये. *या धारणेने विद्यार्थी मोठा होतो आणि मग पुढे आयुष्यात वावरताना नोकरी करताना व्यवसायामध्ये लोकांशी वागतांना जड जाते. कारण जग आपल्या म्हणण्यानुसार नाही चालत. आयुष्यात मान-अपमान हे दोन्ही येत राहते.* मारणं हे अयोग्य न त्याला मी काय कोणी ही समर्थनं करणार नाही पण वर्गात रागावणं सुद्धा आजकाल बंद झाले न त्या मुळे अपमान कसा सहन करावा आणि त्यातून self analysis कसे करावे ही प्रक्रियाच मुलांच्या मनांत होत नाही. जी सर्वंगीन विकासा साठी आवश्यक आहे.
काही झाले की पालक शिक्षकांशी चर्चा करायला येतात ज्यामध्ये चर्चेचा सूर कमी आणि कोर्टात जसे आरोपीला प्रश्न विचारतात तसेच पालक शिक्षकांना विचारतात. या सर्व संवादामुळे मुलाच्या मनात शिक्षकांविषयी चा आदर निघून जातो आणि विद्यार्थी हे शिकतो की मला काही अडचण आली तर आहे माझी आई. त्याच्या प्रत्येक (चुकीच्या) निर्णयांमध्ये आई सहभागी होते. ती स्वतः निर्णय घेते. . ती इतकी involve होते की त्याचा अपूर्ण राहिलेला होमवर्क, प्रोजेक्ट, अभ्यास ती स्वतः पूर्ण करते. पाल्य दुसऱ्यांवर अवलंबून राहायला शिकतो. स्वावलंबनाचे धडे लहानपणी द्यायचे असतात ते ती विसरून जाते. हे मुलं मोठी झाली आणि घरात आग लागली तरी फायर ब्रिगेडला फोन करायला असतो हे सुद्धा त्यांना लवकर सुचत नाही एवढे ठम्ब बनतात कारण लहानपणापासून मुलांसाठी आपण Ready made answer देत होतो.
जिथे पालक शिक्षकांची उद्धटपणे वागतात तिथे विद्यार्थ्यांची प्रगती खुंटते. मानसशास्त्राचा नियम आहे. . जेव्हा विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांबद्दल आदर असतो, श्रद्धा असते तेव्हा शिक्षक जेव्हा वर्गात शिकवतात तेव्हा अंतर्मनाची द्वारे आपोआप उघडली जातात आणि शिक्षक जे शिकवतात ते लक्षात राहण्याची शक्यता अधिक असते. जेव्हा पालक विद्यार्थ्यांसमोर त्यांच्या वर्ग शिक्षकांशी उद्धटपणे बोलतात किंवा सातत्याने भेटून तक्रारीचा पाढाच गात राहतात तिथे पाल्याच्या मनातील शिक्षकांबद्दलचा आदर कमी होत जातो आणि त्याचे शैक्षणिक समस्या चे प्रमाण वाढत जाते.
काही पालक खास करून आया आपल्या बद्दल नेहमी असमाधानी असतात. पालकत्वाची A B C D सुद्धा माहित नसलेल्या या आया शिक्षकांसमोर माझं मूल कसं मूर्ख आहे, त्याला कसं कळत नाही आणि या सर्वाला एकमेव टिचरस कसे जबाबदार असतात हे मोठ मोठ्या आवाजात दहा पालकांसमोर बडबडत असतात. *अशा पालकांच्या पाल्याचे भविष्याबद्दल खरच चिंता वाटते कारण असे पालक समजून घेण्याच्या पलीकडचे असतात.* काही पालक तर मुख्याध्यापकांकडे हट्ट धरतात की शिक्षकांना बोलवा आणि माफी मागायला लावा. यातून टीचेर्स चे मनोधैर्य कमी होते. ती शाळेतील एक्स्ट्रा कामे करायला कंटाळा करते. शिक्षकांना कडून उत्तम कामाची अपेक्षा असेल तर त्याचे कौतुक होणेही गरजेचे असते खास करून ज्या शाळा फक्त अभ्यास शिकवण्याचे कार्य करत नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करण्याची धडपड करत असतात आणि त्यासाठी सातत्याने नवनवीन अॅक्टिविटी चे आयोजन करत असतात. अशा ऍक्टिव्हिटी घेण्यासाठी मुख्याध्यापकांना उत्तम नियोजनाबरोबर शिक्षकांचे सहकार्य अपेक्षित असते. हे सहकार्य हळू हळू कमी होते.
*या काही कुरकुरे पालकांमुळे शिक्षकांचा उत्साह कमी होतो.* प्रत्येक शाळेत असे कुरकुरे पालक असतात त्याचे प्रमाण दहा टक्के पण नसते पण त्यांच्या चुकीच्या संवादामुळे, चुकीच्या पालकत्वामुळे, चुकीच्या अपेक्षेमुळे शाळा व्यवस्थापनाशी वाद होतात. 90% पालक हे शाळेबद्दल नेहमी आनंदी असतात पण ते बघ्याची भूमिका घेतात. शिक्षकांना कौतुक करण्यात ते कंजुषी करतात आणि मग हे 10% पालक अतिशय उद्धटपणे विषय हाताळतात. सोशल मीडिया, वृत्तपत्र यांना चुकीच्या माहिती देऊन बातम्या प्रसिद्ध करतात. व्यक्ती/संस्था जेवढी मोठी तेवढ्या तिखट-मीठ लावून बातम्या रंगवल्या जातात.. या सर्वांची सुरुवात झाली असते ती म्हणजे अतिमहत्त्वाकांक्षा अति अपेक्षा चुकीच्या पालकत्वाच्या या बीजातून.
कालच बातमी वाचली नाशिकमध्ये एक पाचवीचा विद्यार्थी दोन दिवस शाळेत आला नाही म्हणून शिक्षकाने आईला फोन करून सांगितले. आई म्हणे तो रोज शाळेत जातोय. आईने मुलाला विचारले, तेव्हा तो कबूल झाला मी शाळेत जातो सांगून घरातून निघतो पण शाळेत जातचं नाही. तो वाईट मुलांच्या संगतीत लागला होता. म्हणून आईने त्याला दोन फटके दिले. आईने मारले याचा राग आला म्हणून त्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. आता या घटनेला कोण जबाबदार? शिक्षक.. ज्याने काळजीपोटी मुलगा शाळेत येत नाही म्हणून फोन केला का आईने त्याला पहिल्यांदाच मारले का तो स्वतः विद्यार्थी ज्याला राग सहन होत नव्हता. आईने आधीपासूनच शिस्ती ला महत्त्व दिले असते, चुकले की रागवले असते, शाळेचे नियम हे भविष्य चांगले करण्यासाठीच असते हे जर पहिलीपासून मनावर बिंबवले असते तर आज ही वेळ कदाचित आली नसती.
*पालकांनो शिस्त ही प्रेमाची पहिली कृती आहे.* शिक्षकांना त्यांची कामे करू द्या. *शाळेचे छोटे छोटे नियम पाळावेच लागतात कारण त्यातून मोठ्यापणी भारतातील कायदे पाळण्याचे संस्कार रुजत असतात.* शाळेत थोड्या उशिरा पोहोचल्याने त्याच्यामध्ये वेळेचे व्यवस्थापनाचे महत्व कमी होते याचे साधे ज्ञानसुद्धा आजकाल पालकांना नसते. आजकालची मुलं अति लाडा पोटी बिघडत चालली आहे त्यांना कोणाचीच भीती उरली नाही. त्यांची वाढ अशीच झाली तर पुढे ते आई-वडिलांची झोप उडवू शकतात म्हणून शाळा शिक्षक आणि पालक यांच्यात मैत्रीपूर्ण वातावरण असणे गरजेचे आहे. शाळेत होणाऱ्या ओपन हाऊस, पालकांच्या मिटींगला शिक्षकांशी सन्मानांनी बोलणे.. त्यांचं कौतुक करणे.. त्यांना समजून घेणे हे तेवढेच महत्त्वाचे आहे. एकमेकांना आदर आणि सन्मान जर राहिला तर त्या विद्यार्थ्यांना योग्य रुळावर आणणे सोपे जाईल.
जिथे शिक्षकांचा सन्मान होत नाही तिथे समाजाची प्रगती खुंटते आणि देशाचे नुकसान होते.
बच्चेकंपनीने उन्हाळ्याची सुट्टी कशी घालवावी यावर शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख..
बच्चेकंपनीला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की वेड लागते ते मामाच्या गावाला जायचे..
उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मामाचे गाव हे समीकरण कितीतरी पिढी चालू आहे. मला आठवते मी पहिली ते दहावी मधे असताना प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये माझ्या मामाच्या गावाला गुजरातला जायचो.
प्रत्येक उन्हाळ्यात माझी आई महिनाभर गुजरातला 'हरेश्वर' या तिच्या छोट्या गावी घेऊन जायची.
गावामध्ये ना टीव्ही ना लाइट, त्यामुळे पूर्ण गाव संध्याकाळी आठ वाजताच झोपायचे आणि आम्ही अंगणात चांदण्या मोजत झोपायचो. सकाळी लवकर उठून गायीचे दूध काढताना पाहणे, ताजे कच्चे दूध पिणे, मामा बरोबर शेतावर जाणे, ऊंटा बरोबर खेळणे, लिंबोणीच्या झाडाखाली मातीत खेळणे, झाडावर चढणे, गावातल्या कोणाच्याही घरी जाऊन झोपाळ्यावर खेळणे, पापड बनवायला मदत करणे, तांदूळ गहू निवडायला मदत करणे, मामीच्या हातची चुलीवरची भाकरी तर कधी खिचडी चे मस्त जेवण करणे.. अशा विविध गोष्टीत उन्हाळ्याची सुट्टी आमची जायची. मामा संध्याकाळी सायकलवर मला पूर्ण गावात चक्कर द्यायचा. त्यामुळे त्याचं नाव चक्कर मामा पडले. हरेश्वर गावात मोर खूप असायचे.. प्रत्येक सकाळी किमान २० ते २५ मोर अंगणामध्ये खेळताना दिसायचे, झाडावर भरपूर पोपट पाहायला मिळायचे.
आता मोठा झाल्यावर, शिक्षण क्षेत्रात अभ्यास करताना लहान मुलांचा मेंदू चा विकास होण्यामध्ये लहानपणी विविध गोष्टींचा अनुभव मिळणे किती आवश्यक असते हे समजते. बाल मेंदूमधील जितक्या पेशी ना चालना मिळेल, जास्तीत जास्त प्रत्येक पेशींचे कनेक्शन निर्माण होऊन सिनेप्स ची निर्मिती होईल त्या प्रमाणात मेंदूचा विकास- बुद्धिमत्ता वाढत असते. सर्वात महत्वाचे, हे सिन्याप्स निर्मिती मेंदूमध्ये तेव्हा होते जेव्हा लहानपणी जितके विविध अनुभव बालकांना मिळेल तेवढे त्याची निर्मिती होत असते. हे सर्व अनुभव बालकाच्या पाच इंद्रियाद्वारे मिळतांना त्याचा बौद्धिक विकास अधिक होतो. लहानपणी हे सर्व अनुभव उन्हाळ्याच्या सुट्टीत एकत्र कुटुंबात मामाच्या गावाला मिळत असे.
आता चित्र बरेच बदलले आहे. मामाचे गावं आता कमी झाले आहे. मामाच्या गावाला टीव्ही मोबाईल यांनी विळखा घातला आहे.
आजकल मामांच शहरात रहायला आल्यामुळे मामाच्या गावाला जाणं बंद पडत चालले किंवा काही ठिकाणी भाऊबंदकी मुळे मामाचं गाव ला जाणे कमी झाले.. तर काही ठिकाणी आई-वडिलांना नोकरीमुळे वेळ नसतो की मुलांना मामाच्या गावाला सोडायला. वेळ असला तरी आजकालचे पालक हे इतके पझेसिव्ह झाले आहे की मुलांना कुठेही एकटे राहायला पाठवत नाही. खरतर जेव्हा मुलं त्यांच्या कंफर्ट झोन तोडून दुसर्यांच्या घरी राहायला जातात तेव्हा त्यांचा विकास जास्त होतो. ते स्वतःचे निर्णय घ्यायला लागतात. पांघरुणाची घडी घालण्यापासून तर स्वतःचे आंघोळीचे पाणी काढणे, जेवणाची तयारी करणे, ताट घेणे, अशा छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी मुलं आपोआप दुसरी कडे राहताना शिकतात. जर मामा शिस्त आणि कौतुक याची सांगड घालून भाच्याशी भरपूर गप्पा मारणारे असतील आणि बाहेरील जग दाखवणारी असतील तर मुलांच्या विकासात अधिक भर पडते.
उन्हाळ्याची सुट्टी मुलांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची सुट्टी असते. तिचे योग्य नियोजन होणे आवश्यक आहे. पण या नियोजनाला अजिबात अतिशयोक्ती नको.
काही कारणाने मामाचं गाव शक्य नसेल तर पालकांनी या सुट्टीत मुलांना एक तरी कला किंवा खेळ याची गोडी लागेल याची काळजी घ्यावी. त्यासाठी क्लासेसची मदत घेऊ शकता. मुलांना एखादा क्लास लावावा पण पुर्ण उन्हाळ्याची सुट्टी भरमसाठ समर कॅम्प लावून संपून टाकू नये. समजा तुमच्या मुलाला मुलीला संगीताची आवड असेल तर त्याला एखादं वाद्य संगीत चा क्लास लावू शकता, शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, नृत्य अशा कार्याची ओळख करून देऊ शकता. पुढे सातत्य ठेवून तो किंवा ती त्या कलेत पारंगत होऊ शकते. मुलं दुसरी तिसरी इयत्तेचे झाले की त्यांना पोहायला शिकू शकता. समजा पाचवी-सहावीच्या पुढे मुलं असतील तर सायन्स वर्कशॉप, रोबोटिक वर्कशॉप ची निवड करू शकता. आपल्या पाल्याचे हस्ताक्षर ठीक नसेल तर हस्ताक्षर वळण कार्यशाळेत पाठवू शकता.. थोडक्यात काय तर त्याची आवड किंवा गरज बघून एखादा समर कॅम्प लावू शकता.
चित्रकलेचे सुद्धा विविध प्रकार या वयात शिकवता येतात. मुलं बालवाडी मध्ये असेल तर विरंगुळा म्हणून धमाल-मस्ती चे समर कॅम्प ला पाठवू शकता. सातवी-आठवीच्या मुलांना ट्रेकिंग, जंगलाची सफर असे साहसी कॅम्पला पाठवू शकता. पण हे समर कॅम्प त्यांना जास्त उपयोगाचे ज्यांना मामाच्या गावाची संधी उपलब्ध नाही आहे. त्यांनी समर कॅम्प ला दोन तीन तासांसाठी पाठवणे ठीक आहे. त्या नंतरचा बाकी सर्व वेळ हा मुलांचा व्हायला हवा.
यामध्ये मुलांना भरपूर पुस्तक वाचायला संधी आणि वाचन वातावरण निर्मिती करून द्यावी. सायकल वर मनसोक्त हिंडायला परवानगी द्यावी. त्याच्या मित्र-मैत्रिणींना आपल्या घरी बोलून "घर डोक्यावर घेऊन" मस्ती करायला परवानगी द्यावी. घरात पापड बनवणे, कुरडया टाकण्यापासून तर गच्चीवर तारे मोजत झोपण्याचे सर्व अनुभव मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत देता येतात.
या उन्हाळ्याच्या सुट्टीत जर कशापासून जपायचे असेल तर अति मोबाईल गेम आणि टीव्हीच्या व्यसनांपासून जपावे. सुट्टी म्हटली की मुले टीव्ही पाहणारच आहे, पण त्याची वेळ शक्यतो दुपारचा एक दीड तास ठेवावा. बाकी सर्व वेळ मनसोक्त खेळण्यात, आरामात उठण्यात, वाचनात, एखादी कला शिकण्यात घालवावा. मी काही आया पाहतो ज्या मुलांचा एक समर कॅम्प संपला की दुसरा.. दुसरा संपला की तिसऱ्या कॅम्पला पाठवतात. शाळेपेक्षा जास्त वेळ त्यांचा समर कॅम्प हजेरित जातो. अशा आयांना सांगतो की एका दिवसात सर्व हळद लावली की जसं माणूस गोरं होत नाही तसं एका महिन्यात सर्व कला कधी येत नसतात.
खरतर मुलांचा मानसिक भावनिक बौद्धिक विकास हा मामाच्या गावाला छान होतो. भारतीय समाजामध्ये मुलांच्या विकासात त्यांच्या लहानपणीच्या आनंदात मामाच्या गावाचे अन्यसाधारण महत्त्व आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी उन्हाळ्याची सुट्टी मामाच्या गावाला घालवावी आणि जर शक्य नसेल तर नियोजन बद्दल विविध अनुभव तेही मोकळ्या वातावरणात मुलांना या सुट्टीत उपलब्ध करून द्यावे. थोडक्यात काय तर उन्हाळ्याची सुट्टी मुलांसाठी अनुभव संपन्न घालवावी..
जी आपण आपल्या लहानपणी घालवली..
सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक
पोस्ट शेअर करू शकता
जेव्हा चिमुकले विचारतात, "मी कुठून आलो?"
प्रत्येक लहान मुलांमध्ये हे कुतूहल असते, माझा जन्म कसा झाला? त्याबाबत शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्र मधील लेख मी कुठून आलो ?
मुलं चार-पाच वर्षांची झाली की हा हमखास प्रश्न विचारतात. माझा जन्म कसा झाला?, मी कुठून आलो?, समजा आई-वडिलांनी त्यांच्या लग्नाचा अल्बम बघायला काढला तर मुलं हमखास विचारतात की, फोटोमध्ये मी का नाही?
त्यावेळेस आपण म्हणतो की तू तेव्हा नव्हता आला. मग तो किंवा ती विचारते त्यावेळेस मी कुठे होतो? आता आपला जन्म कसा झाला याबाबत मूल खूप जिज्ञासू असतात. त्यांची जिज्ञासा ही शास्त्रीय पद्धतीने सोडवली पाहिजे.
पण खूप सारे पालक मुलांना या प्रश्नाचे अशास्त्रीय उत्तरे देतात. पहिले तर पालक असे प्रश्न विचारले की चिडतात. हे काही पण प्रश्न विचारू नको.. असं म्हणून शांत करतात. काही पालक म्हणतात, "तुला ना आम्ही भाकरीवर घेतले",आहे काहीजण म्हणतात, "तुला देव बाप्पा ने पाठवले आहे", मग तो किंवा ती विचारतोय की, "देवाने इथेच का पाठवले?", "पण देवबाप्पाला कोणी पाठवले?" काही पालक म्हणतात, तुला हॉस्पिटलमधून आणले.. मुलं विचारतात की मी आजारी होतो का? मला का हॉस्पिटल ला ॲडमिट केले होते? मी हॉस्पिटलमध्ये कसा पोहचलो?, काही पालक सांगतात की तू आईच्या पोटातून आला मग तो किंवा ती विचारते मी आईच्या पोटात कसा गेलो? आपण म्हणतो, "देव बाप्पाने तुला डायरेक्ट आईच्या पोटात सोडले", पण जेव्हा हे मूल मोठे होतात.. चौथी पाचवी वर्गात आले की त्यांचं जनरल नॉलेज एवढे वाढले असते की तेव्हा त्यांना समजते की आपल्याला आई-वडिलांनी ना भाकरीवर घेतले ना हॉस्पिटलमधून देवाने डायरेक्ट पाठवले. त्यावेळेस त्यांना संस्कृतिक शॉक लागतो. अशा परिस्थितीमध्ये त्याला जे काही बाहेरुन जनरल नॉलेज मिळाले असते ते कितपत शास्त्रीय असते याबाबत नेहमीच शंका असते कारण हा विषय मित्र-मैत्रिणींकडून चर्चिला जातो. मग त्या मधे एखादा ऍडव्हान्स मुलगा म्हणतो अरे जन्मा साठी आई-वडिलांना सेक्स करावा लागतो आणि आणि सेक्स कसा करता याबाबत खूप चुकीची माहिती मुलांच्या पदरी पडते. त्यामुळे जन्माबाबत मुलांना त्यांच्या वयानुसार खरी व योग्य शास्त्रीय माहिती सांगणे कधीही योग्य. समजा तुमचा मुलगा मुलगी तीन ते सहा वर्षाची आहे.. आपण तिला झाडाच्या रोपट्याचे उदाहरण देऊन समजून सांगू शकतो. एक छोटी कुंडी घेऊन त्यामध्ये माती टाकून एक छोटसं झाडाचं बी त्या मधे पेरयाचे.. वरतून थोडी माती टाकून पाणी टाकून त्यानंतर त्याला सांगा थोड्याच दिवसात छोटे रोपटे येईल तसा तुझा जन्म होतो. त्याला आपण सांगू शकतो की, माती म्हणजे आई चे पोट आहे आणि हे बाबांनी जे बी आईच्या पोटामध्ये लावलेला आहे त्याला खत पाणी टाकून आता त्या बी चे जस छोटसं रोप झाले म्हणजेच बाळाचा जन्म होतो. आता मुलं जरा मोठी असतील दूसरी ते चौथी इयत्तेतील असतील तर मुलांना आपण सेक्स एज्युकेशन च्या माध्यमातून योग्य माहिती पोहोचू शकतो. त्यांना सांगणे अत्यंत आवश्यक आहे की, प्रत्येक मुलगा मोठा झाल्यावर पुरुष होतो व प्रत्येक पुरुषाला लिंग व अंडग्रंथी असतात. प्रत्येक मुलगी मोठी झाल्यावर स्त्री होते प्रत्येक स्त्री ला योनी, गर्भाशय व स्तन असतात. स्त्रीच्या शरीरात म्हणजे आईच्या शरीरात मुलं तयार होते व वाढते. स्त्री मुला-मुलींना जन्म देते. स्त्रीकडे "स्त्री बीज"असते आणि पुरुषाकडे "पुरुष बीज" असते. ते परस्परांना भेटतात आणि स्त्रीच्या पोटात गर्भ तयार होतो. जेव्हा स्त्री आणि पुरुष परस्परांवर प्रेम करतात तेव्हाच गर्भ तयार होतो. हा गर्भ आईच्या पोटात नऊ महिने वाढतो. त्याचे पालन पोषण होते. गर्भ वाढत असताना आईचे पोट मोठ होतं.. पूर्ण वाढ झाली की बाळाचा जन्म होतो. दूसरी, तिसरी चौथी च्या मुलांना एवढे सांगितले तरी खूप झाले. खूप खोलात सांगायची गरज नसते. मुलांच्या कानावर हे शास्त्रीय शब्द जरी गेले तरी खूप झाले. या पद्धतीने जेव्हा पुढे मुलांना सेक्स एज्युकेशन द्यायची वेळ येते तेव्हा मुलं आई-वडिलांन बरोबर मनमोकळ्या गप्पा मारतात. त्यांच्या वागण्यात एक खुले पण असते. अशा चर्चेतून मुलं बाहेरून चुकीची माहिती न शिकता आई-वडिलांकडून समजून घेण्यात त्यांना जास्त रस असतो.
सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक
शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्र मधला लेख..
किसी की मुस्कुराहटों पे हो निसार,
किसी का दर्द मिल सके तो ले उधार,
किसी के वास्ते हो तेरे दील मे प्यार
जीना इसी का नाम है..
अनाड़ी फिल्म मधील गीतकार शैलेंद्र यांचे हे गाणे भावनिक बुद्धिमत्ता असणे म्हणजे काय हे दर्शवते. आजकाल आपण एक कन्सेप्ट नेहमी ऐकतो ती म्हणजे EQ. एकविसाव्या शतकात यशस्वी व्हायचे असेल तर फक्त IQ उत्तम असून चालणार नाही तर सोबत EQ तेवढाच उत्तम असणे आवश्यक आहे.
ज्या पद्धतीने आपण चंगळवादाकडे आकर्षित होत आहोत, आयुष्य अति व्यक्ति केंद्रित होत चालले आहे. अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या पिढीचा भावनिक बुद्ध्यांक हा कमी होत जाईल.
आई-वडील स्पर्धेच्या नावाखाली मुलांच्या आयक्यू अधिकाधिक कसा वाढेल, तो किंवा ती प्रत्येक विषयात, अभ्यासात पहिलाच कसा येईल यावर मेहनत घेताना दिसत आहेत.. पण विविध संशोधन आणि रिपोर्ट सांगतात 2040 साली ज्यांचा EQ अधिक चांगला असेल त्यांना उत्तम नोकरी-व्यवसाय यामध्ये संधी अधिक असेल.
भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय?
जॉन डियर या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार लोकांची भावना ओळखण्याची क्षमता असणे, तसेच स्वतःची सुद्धा भावना समजून हाताळता येणे व त्यानुसार विचार करणे म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता असणे.
थोडक्यात स्वतःचा आणि दुसऱ्यांच्या भावना ओळखता येणे हे महत्त्वाचे. आपल्याला लक्षात येईल की मेरिट लिस्ट मध्ये पहिले आलेले, युनिव्हर्सिटी मध्ये गोल्ड मेडल मिळाले विद्यार्थी आयुष्याच्या परीक्षेत जास्त चमकत नाहीत.. तिथे ते अपयशी दिसतात आणि वर्गातील ऍव्हरेज विद्यार्थी हा आयुष्यात यशस्वी होताना दिसतो. याचे मूळ कारण म्हणजे त्या विद्यार्थ्यांमध्ये EQ कसा विकसित झाला आहे त्यावर अवलंबून असते.
व्यक्ति खूप हुशार जरी असला तरी सहकाऱ्यांचे जर पटत नसेल, टीमला घेऊन पुढे जाता येत नसेल, ताणतणाव व्यवस्थापन जमत नसेल, मैत्रीपूर्ण वर्तणूक जमत नसेल, आपल्या हाताखाली काम करणाऱ्यां कर्मचाऱ्यांना योग्य सन्मानाने वागणूक देता येत नसेल तर कितीही हुशारी असली तरी तो किंवा ती यशस्वी होऊ शकत नाही. कारण यश कधी एकट्याने साधण्याची गोष्ट नसते.. तुमच्या आजूबाजूला योग्य आणि चांगली माणसे जोडून राहिली तर ती तुमच्या मेहनतीला यशाकडे घेऊन जाता jiत.
ज्यांच्या इमोशनल कोशन उत्तम असतो त्यांना आजूबाजूला योग्य आणि चांगली माणसं जोडून ठेवता येतात.
प्रश्न हा आहे की भावनिक बुद्धिमत्ता वाढवता येते का? लहानपणी आपल्यावर कसे संस्कार झाले त्यावर भावनिक बुद्धिमत्ता अवलंबून असते. मोठेपणी सुद्धा स्वतःचा EQ मेहनत घेऊन स्वभाव बदलता येतो.
आजकाल विभक्त कुटुंब पद्धती, कुटुंबामधील व्यक्तींचे एकमेकांपासून दूर होत चाललेले संभाषण, स्पर्धेच्या नावाखाली मुलांकडून अति अपेक्षा, अति अभ्यासाचा ताण, त्यातून निखळ आनंदासाठी खेळणे दुर्लभ होणे, टीम बिल्डींग गेम सर्व हद्दपार होणे, आई-वडिलांचे भांडणे, या सर्व कारणांमुळे मुलांची भावनिक बुद्धिमत्ता कुंठते.
त्यात आजकालचे विद्यार्थी शिक्षकांना सन्मान देत नाही कारण घरात पालक शिक्षकांना सन्मान देत नाहीत, तरुणांना नातेसंबंधाचे महत्त्व नाही कारण भाऊबंदकी सारखा रोग घराघरात झाला आहे, पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होती.. घरांमध्ये पंधरा-वीस लोकांची वर्दी नेहमी असायची. मुलं स्वतःच्या घरात कमी आणि मित्रांच्या घरी कॉलनीमध्ये जास्त खेळायचे. एक चॉकलेट सर्व मित्र मिळून खायचे, भांडणं झाली तरी आई-वडील मध्ये पडायचे नाही..
या सर्वातून मानवी संबंध जपण्याचे संस्कार व्हायचे.
आपल्या काळात कुठल्या विषयात किंवा स्पर्धेमध्ये अपयश जरी आले तरी ती स्वीकारण्याची मनाची प्रसन्नता होती. सध्या विद्यार्थ्यांना अर्धा मार्क जरी कमी पडला तरी शाळेमध्ये आई भांड्याला येतात. विद्यार्थी सुद्धा अपयश मान्य करायला तयार नसतात. आजकाल कंपनीत मोठ्या पदावर नोकरी देताना जो नेहमी प्रत्येक परीक्षेत पहिला आला आहे त्याला नोकरी देत नाहीत कारण त्यांचे म्हणणे आहे की या लोकांना अपयश आले तर ते कसे हाताळायचे हे माहीत नसते आणि त्यामुळे ती खोल नैराश्य जातात. त्यातून कंपनीला नुकसान सोसावे लागते.
म्हणून आजकाल मी पालकांना सांगतो की तुमचा पाल्याला अधून मधून अपयशाचे पण संस्कार टाका. पालक मुलांचे सर्व हट्ट पुरवायला तयार असतात.
अति लाड मुळे मुलांना "नाही" ऐकायची सवय राहत नाही आणि मोठ्यापणी प्रेमात नकार आला तर तो पचवता सुद्धा येत नाही. "नाही" ऐकायची सवय नसलेली व्यक्ती कुठलाही संस्थेची बॉस झाले तर त्याच्या / तिच्या हाताखाली चे सर्व सहकारी दहशतीखाली राहतात. थोडक्यात काय तर आयुष्यात IQ सोबत EQ तेवढाच महत्वाचा असतो.
EQ चांगला असणे म्हणजे दुसऱ्याचे संवेदना समजून घेता येणे, आपल्या भावना योग्य पद्धतीने मांडता येणे, आपल्या हातून झालेल्या चुका मान्य करणे, दुसऱ्यांना दोष न देणे, आपल्या चुकीचे सातत्याने कारणे ( एक्सउसेस) न सांगणे, दुसऱ्यांवर विश्वास ठेवता येणे आणि स्वतः विश्वासू व्यक्तिमत्व असणे, दुसऱ्यांच्या भावना समजणे व त्यांच्या सन्मान करता येणे.. असे बरेच क्षमता भावनिक बुद्धिमत्ता मध्ये येतात.
मुलांचा मोबाईलच्या अतिवापर, आभासी जगात रमणे, टीव्ही पाहण्याचे अतिप्रमाण, या सर्वांनी सुद्धा मुलांच्या भावनिक बुद्धिमत्तेवर नकारात्मक परिणाम होतात.
पालकांनो घरात आनंदी वातावरण, प्रेमाचे नाते संबंध, शाळा आणि शिक्षकांबाबत आदर, भरपूर मैदानी खेळ, टीव्ही मोबाईलच्या मर्यादित वापर, पती-पत्नीचे एकमेकांवर प्रेम आणि ते मुलांनी सातत्याने पाहणे, घरातील कामवाली बाईंना सुद्धा सन्मानाने वागणूक, गरजूंच्या मदतीला धावून जाणे असे कितीतरी गोष्टीतून पाल्याचा भावनिक विकास होत असतो. घरा सोबत मुलांचा भावनिक विकास वाढवण्यामध्ये शाळेचा सुद्धा महत्त्वाचा वाटा असतो.
पालकहो, लहान असो की मोठे सगळ्यांनी एकमेकांचा आदर ठेवून वागणं ही भावनिक बुद्धिमत्ता वाढवायची पहिली पायरी आहे.... जीना इसी का नाम है..
सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक
सचिन उषा विलास जोशी यांचा लोकमत सखी मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात प्रकाशित झालेला लेख.
झोप ही अशी गोष्ट आहे की कमी झाली तर शारीरिक व्याधी वाढतात आणि जास्त झाली तर आळशीपणा वाढतो आणि आळशी पणातून मानसिक शारीरिक तक्रारी वाढतात. त्यातल्या त्यात लहान मुलांची झोप हा अतिशय संवेदनशील विषय आहे.
लहान मुलांची शारीरिक वाढ ही त्या मुलांची झोप कशी आहे? त्यावर अवलंबून असते. ज्यांची झोप उत्तम आणि शांत, गाढ़ असते त्यांची शारीरिक आणि मानसिक वाढ उत्तम होत असते. ज्या मुलांची झोप कमी होते त्या मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढण्याची शक्यता अधिक असते. एकाग्रतेचे प्रमाण सुद्धा उत्तम झोपेवर अवलंबून असते. जर विद्यार्थ्यांची झोप पुरेशी झाली नसेल तर त्यांना दुसऱ्या दिवशी वर्गामध्ये सुस्ती येणे, लक्ष नसणे, चिडचिड करणे यांचे प्रमाण वाढते आणि याचा परिणाम म्हणजे त्यांची शैक्षणिक वाढ खुंटते.
अशी मुलं मारामारीमध्ये ऍक्टिव्ह होतात, वर्गामध्ये असण्यापेक्षा वर्गाच्या बाहेर जास्त राहतात. त्यांच्यात हाइपर एक्टिव चे प्रमाण सुद्धा जास्त असते. या प्रकारच्या वर्तणुकीमध्ये अजून काही कारणे असतात पण त्यामध्ये प्रमुख कारण हे मुलांशी पुरेशी झोप नसणे. आता हे नीरो सायन्स ने सुद्धा सिद्ध केले आहे की मेंदूची निकोप वाढीसाठी पुरेशी झोप अत्यंत आवश्यक असते. यावर जगात विविध संशोधन सुद्धा झाली आहे.
मुद्दा हा आहे की पुरेशी झोप म्हणजे किती? आणि ती कशी मिळेल? साधारण तीन ते पाच वर्षाच्या मुलांना म्हणजे नर्सरी, ज्युनिअर केजी आणि सिनियर केजी च्या विद्यार्थ्यांना सलग 11 ते 12 तास झोप आवश्यक असते. यामध्ये सलग शब्द महत्त्वाचा कारण सलग झोपे मुळे मेंदू आणि शरीर उत्तम रिलॅक्स होत असते. मेंदू जेवढा रिलॅक्स तेवढा तो नवीन गोष्टी आत्मसात करायला त्तपर असतो. पुरेशी झोप झाली नसेल तर दुसऱ्या दिवशी वर्गात टीचर जे काय शिकवतात ते मानसिक पातळीवर ग्रहण करायला विद्यार्थी तयार नसतात. तो किंवा ती फक्त शरीराने वर्गात हजर असते पण मनाने आणि बुद्धीने गैरहजर असते.
मुलांचे वय सहा ते दहा वर्षाचे असेल म्हणजे पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना किमान दहा ते अकरा तास सलग झोप आवश्यक असते तर अकरा ते सोळा वर्षाच्या मुलांना किमान नऊ तास झोपेची अत्यंत गरज असते.
आता प्रश्न हा आहे की ही झोप मुलांना मिळते का? आणि जर मिळत नसेल तर त्याचे काय दुष्परिणाम होतात? त्या पुरेशा झोपेचा शत्रू कोण आहे? परदेशांमध्ये असे लक्षात आले की मुलांना हवी तेवढी झोप मिळत नाही. सार्क इंस्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल स्टडी आणि वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी यांच्या संशोधनात लक्षात आले की तिकडचे विद्यार्थी सहा ते सात तास झोपतात किंबहुना त्यांना फक्त तेवढीच झोप मिळते. म्हणून वॉशिंग्टनमधील सर्व शाळा ज्या साडेसात वाजता भरायच्या त्या आता साडेआठला भरतात. एक तास उशिरा शाळा सुरू करून तिथील विद्यार्थ्यांना सकाळचा अधिकचा एक तास झोपायला मिळतो.
मुद्दा हा आहे की फक्त शाळा एक तास उशिरा केल्याने हा प्रश्न सुटेल का? मला वाटतं आज परदेशातील विद्यार्थी रात्री खूप उशिरा झोपतात. त्यांचा स्क्रीन टाइम हा झोपेच्या वेळे इतका होत चाललाय. विद्यार्थी रात्र-रात्र टीव्ही पाहतात, मोबाईलवर गेम खेळतात या सगळ्यातून त्यांना झोपायला रात्रीचे बारा वाजतात.
परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की, पालक मुलांना समजून सांगू शकत नाही म्हणून शाळेवरच दबाव आणून शाळेची वेळ उशिरा करीत आहे. टीव्ही, मोबाईल गेम याच्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कायमस्वरूपी मेंदूमध्ये बदल होतात. विचार करणे, चिंतन करणे, माहिती चा अर्थ काढणे या सर्व क्रिया शाळेमध्ये होत असतात.. जेव्हा रात्री विद्यार्थी खूप वेळ टीव्ही पाहतात त्या वेळेस त्यांचे शरीर आणि मन निष्क्रिय होत असते. त्यांचा तल्लख़ मेंदू हा हळूहळू सुस्त होत जातो. याचा परिणाम त्यांच्या विचार करण्याच्या संधी वर होतो. जे मुलं विचार करत नाही ते शिकत नाही व जे शिकत नाही ते शैक्षणिक दृष्ट्या अप्रगत राहतात. यामध्ये भर म्हणजे टीव्ही आणि इतर कारणाने उशिरा झोपतात त्यामुळे चांगली झोप मिळत नाही आणि चांगली झोप नसल्याने त्यांचा मेंदू आणि शरीर रिलैक्स होत नाही.
अमेरिकेमध्ये स्क्रीन टाईम वर मेहनत घेण्यापेक्षा सरळ शाळा एक तास उशिरा केली. पण ते कायमस्वरूपी चे उत्तर नाही आहे.
भारतामध्ये पण या पद्धतीची जीवनशैली होत चालली आहे. भारतामध्ये सुद्धा टीव्ही आणि मोबाईल गेम्स चे प्रमाण वाढलेले आहे. भारतात सुद्धा मुले रात्री अकरा साडे अकरा वाजता झोपतात. आपल्याकडे बऱ्याच शाळा सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी भरतात. त्यात आजकाल शाळा लांब असल्याने विद्यार्थ्यांना साडेपाच-सहा वाजता उठावे लागते. त्यामुळे भारतातील विद्यार्थ्यांची झोप सुद्धा सात ते आठ तास होत आहे.
खरंतर हा इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा प्रश्न जास्त अधिक आहे आणि त्यातल्या त्यात मेट्रो शहरांमध्ये हा प्रश्न गंभीर झाला आहे. ग्रामीण भागात सर्वजण आजही रात्री साडेनऊ वाजता झोपतात त्यामुळे त्यांचा दिवस सकाळी सहा वाजता सुरू होतो.
यावर उपाय म्हणजे पालकांनी मुलांचा स्क्रीन टाईम कमी करणे. मुलांना मैदानी खेळ भरपूर खेळू देणे. जेणेकरून मुले उशीरात उशीरा रात्री दहा वाजता झोपतील आणि सर्वच शाळेने त्यांची वेळ सात वाजेपासून बदलून ते पुढे आठ वाजता करणे. पण जिथे प्री-प्रायमरी (३ ते ६ वर्षातील मुलं) आहे, तिथे शाळेची वेळ साधारणतः नऊ वाजता करणे अपेक्षित आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांची वयानुसार दहा ते आकरा तासाची झोप पूर्ण होईल.
इथे फक्त शाळेने वेळ बदलून चालणार नाही तर पालकांनी मुलांच्या रात्री झोपेच्या वेळी बाबत कठोर भूमिका घेऊन लहान मुले खास करून तीन ते बारा वर्षाच्या आतील मुलं यांनी रात्री नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान झोपतील याबाबत दक्ष होणे गरजेचे आहे.
जगात फ़िनलैंड हा देश उत्तम शिक्षण देणारा देश समजला जातो. तेथील सर्व शाळांच्या वेळा या साडे आठ ते नऊच्या दरम्यान भरतात आणि पालकांना मुलांना लवकर झोपायला प्रोत्साहित करतात. त्यामुळे त्या देशातील मुलांची एकाग्रता, स्मरणशक्ती, ग्रहणशक्ती व शारीरिक वाढ इतर देशातील विद्यार्थ्यांन पेक्षा अधिक चांगली आहे.
भारतामध्ये ज्या शाळा सात वाजता भरतात त्यांनीसुद्धा आठ वाजता शाळा भरवल्या आणि पालकांनी मुलांना लवकर झोपण्याची सवय लावली तर अधिक आरोग्यदायी विद्यार्थी भारतात घडतील.
टीप: आदिवासी शाळा, ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा मधील विद्यार्थी रात्री लवकर झोपतात. त्यांची दहा ते अकरा तासाची झोप पुरेशी होते. त्यामुळे त्यांना आठ वाजता शाळेत यायला काही अडचण नाहीये. तरीही आदिवासी शाळेची वेळ सकाळी 11 वाजता करण्यात आली याचे मूळ कारण बहुतांशी त्यांचे शिक्षक हे शहरातून मुलांना शिकवायला येतात. ते वेळेत पोहोचू शकत नाही म्हणून शिक्षकांच्या सोयीसाठी आदिवासी शाळा आता उशिरा भरतात.
सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक
शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचे सकाळ वृत्तपत्रातले दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी लेख.
विद्यार्थी मित्रांनो परीक्षा अटळ आहे, तिला धीराने सामोरे जायला हवे. त्यासाठी अभ्यास करून जय्यत तयारी करायलाच हवी. परीक्षेला सामोरे जाताना सहजतेने, निर्भयपणे, योग्य निर्णय घेत वाटचाल करावी लागते.... कारण परीक्षा ही गुणांची चाचणी नसते तर मानसशास्त्रीय शक्तींची ही चाचणी असते. काही विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाताना खंतावलेले , धास्तावलेले आणि अति भीती बाळगतात त्यामुळे त्यांच्या हातून पेपर सोडवताना छोट्या छोट्या चुका होतात. त्या चुका टाळण्यासाठी काही गोष्टी पाळायला हव्यात आणि काही गोष्टी टाळायला हव्यात. परीक्षेमध्ये कुठल्या गोष्टी पाळायला हव्यात आणि कुठल्या टाळायला हव्यात त्या पुढीलप्रमाणे....
१. परीक्षा जवळ आल्यानंतर नवीन कोणताही अभ्यास करू नये. त्यामुळे नवीन टॉपिक समजून घेण्यात वेळ वाया जाईल आणि तो टॉपिक समजला नाही तर टेन्शन घेऊन आत्मविश्वास कमी होईल.
२. परीक्षा जवळ आल्या नंतर झालेल्या अभ्यासातील उजळणी करावी. नमुना सराव प्रश्नपत्रिका सोडवाव्यात.
३. परीक्षेच्या आदल्या दिवशी पुरेशी झोप घ्या. किमान पाच तास झोप हवी.
४. ज्या विषयाचा पेपर आहे. त्या विषयाची धावती उजळणी करावी, उजळणी करताना केवळ लघु मुद्द्यांची नोंदीची वही नजरेखालून घाला. अमुक प्रश्न येईल, तमुक प्रश्न येईल म्हणणार यांकडे पूर्ण दुर्लक्ष करा.
५. परीक्षेच्या काळात आणि परीक्षेच्या दिवशी चिडखोर , संतापी आणि अप्रसन्न वृत्तीच्या व्यक्तींना भेटण्याचे टाळावे.
६. परीक्षेचे जे सेंटर आले आहे त्या शाळा-महाविद्यालयांमध्ये गेल्यावर जेथे शांत वातावरणात आणि सावली आहे अशा जागी थांबावे. कॅन्टीन किंवा कार्यालय जवळ थांबू नये.
७. एन वेळी घरी फोन करावा लागला तर घरचा लँडलाईन नंबर वडील आई यांचा नंबर आणि शाळेतील मुख्याध्यापकांचा नंबर आपल्याजवळ हवा.
८. आपण ज्या भागाची जय्यत तयारी केली आहे त्याचीच आठवण परीक्षेच्या काही मिनिटे आधी करावी म्हणजे आत्मविश्वास कायम राहण्यास मदत होते .
९. काही अपरिहार्य कारणांमुळे मनावर ताण असल्यास जवळच्या मित्रांशी, घरच्यांशी बोलून मन मोकळे करा . कुढत बसू नका .
१०. परीक्षा काळातील घरातील, परिसरातील वादविवाद, भांडणे यांच्याकडे दुर्लक्ष करा.
११. वेळेचे नियोजन करताना शेवटची 10 मिनिटे उत्तरपत्रिका तपासण्यासाठी मोकळे सोडा.
१२. पेपर संपला की सरळ घरी या. मित्रांबरोबर चर्चा करू नका. तुमचे उत्तर बरोबर असले तरी तुमचा स्वतःवर विश्वास नसतो. मग उगाचच मनामध्ये शंका निर्माण होते.
१३. बोर्डाच्या धोरणानुसार प्रत्येक प्रश्नपत्रिकेतील 20% प्रश्न सोपे असतात. ६० प्रश्न सर्वसाधारण व विद्यार्थ्याना सोडविता येण्यासारखे असतात तर उरलेले टक्के प्रश्न हे कठीण असतात. त्यामुळे उत्तीर्ण होणे अजिबात अवघड नाही .
१४. परीक्षेचा अर्थ एवढाच आहे की ठराविक कालावधीत निश्चित माहिती अचूक वेळी आठवण लिहिणे विद्यार्थ्यांनो मनावर खूप ताण आला तर त्यावेळी आकलन शक्ती निर्णयशक्ती यावर विपरीत परिणाम होतो.
१५. परीक्षाकाळात अभ्यासात वेळ घालवण्याऐवजी मंदिरात जाऊन नवस करणे, साधू-संन्याशांना भेटणे, एक एक तास पूजा मंत्र म्हणणे टाळावे. परीक्षा काळात चुकून सुद्धा स्वतःचे भविष्य अजिबात वाचू नये.
१६. विद्यार्थ्यांनी सोबत पाण्याची बॉटल आणि त्यात गुरु कोंडे टाकून नेला तर अधिक उत्तम उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डिहायड्रेट होणार नाही याची काळजी घ्यावी.
१७. उत्तरपत्रिका लिहिताना अचानक ब्लांक होणे, शब्द निसटणे, मुद्दा विसरणे हे स्वाभाविक आहे पण अडचण कुठे होते तर त्यानंतर तुम्ही तुमच्या मनात नकारात्मक विचार करतात आणि पुढे मग आठवत नाही. म्हणून अशी वेळ आली तर अजिबात नकारात्मक विचार न करता मनामध्ये पॉझिटिव्ह सेल्फ टॉक करावा. जसे, "मला आठवेल..नक्कीच आठवेल.. मी आठवण्याचा प्रयत्न करतो आहे", असं मनात विचार आला की तुम्हाला आठवायला नक्कीच लागेल.
१८. सर्वात महत्त्वाचं, परीक्षा काळामध्ये पालकांनी आपल्या पाल्याला किती मार्क अपेक्षित आहे याची बडबड करू नये. हा वेळ टार्गेट करण्याचा नसून तर भावनिक आधार देण्याचा असतो. सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा.
-सचिन उषा विलास जोशी शिक्षण अभ्यासक
शिक्षणअभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रा मधील लेख.
नाशिक मध्ये मागील वर्षी एक धक्कादायक घटना घडली. खरतर अशा घटना आजकाल रोज ऐकायला येतात पण त्यावर हळहळ व्यक्त करून, राग व्यक्त करून आपण आपल्या कामात व्यस्त होतो.. मनात विचार करतो हे आपल्या मुलीं बाबत होणार नाही. पण येथेच आपण चुकीचा विचार करतो. नाशिक माधिल एका अल्पवयीन मुलाने शाळकरी मुली बरोबर सोशल मीडियाद्वारे मैत्री केली, त्या मैत्रीचे फोटो काढले आणि काढलेल्या छायाचित्राचा धाक दाखवून त्या शाळकरी मुलीवर वारंवार बलात्कार केला. आपण नेहमी सारखे प्रश्न उपस्थित करतो की लहान वयात मुलांना इंटरनेट का दिले? मुलींना मोबाईल का दिला? पालकांना कसे माहित नाही की आपली मुलगी फेसबुक वर कोणाबरोबर गप्पा मारते? आपल्या मुलीचे कोण मित्र सोशल मीडियावर आहेत? मला असे वाटते की या पद्धतीने समस्या सुटणार नाही... खोलात जाऊन विचार करून कायम स्वरूपाचे घरात काय उपाय करावे लागतील की जेणे करून फुलणाऱ्या या नाजूक कळ्या उमलण्या आधीच कोणीही चुरडू शकणार नाही... या नाजूक कळ्यांना असे कुठले विचारांचे खत टाकले पाहिजे की जेणे करून यांचा विकास आणि वाढ उत्तम होईल. खरतर या सातवी ते बारावी मधील मुली अतिशय नाजूक वळणावर असतात. त्यांना सोशल मीडियाचे आकर्षण असणारच आहे. त्यांचे कॉलेजला मित्र होणारच आहे. सोशल मीडियाचा कसा वापर करावा याबाबत पोलीस आणि एन.जी. ओ. समुपदेशन करतातच. पण एक महत्वाची गोष्ट जी आई वडील घरात करू शकतात ती म्हणजे आपल्या मुलीचे आपल्या सोबत एक विश्वासाचं नातं प्रस्थापित करणे. हे विश्वासाचं नातं निर्माण करण्यासाठी महत्वाचा मुद्दा असा की आई - वडिलांनी आपल्या मुलीला समजावून सांगणे की, समजा कदाचित चुकून तू या फेसबुक, व्हॉट्सअप अथवा सोशल मीडियाच्या कुठल्याही माध्यमात अडकली असशील, कोणी त्यावरून तुला ब्लॅकमेल अथवा धमकी देत असेल तर तू आम्हाला आधी सांगशील. भले या मध्ये स्वतः तू अडकली असशील किंवा तुझी स्वतःची चूक जरी असेल तरी आम्हाला सांग. तुझी चूक आहे म्हणून आम्ही तुला रागवणार नाही, मारणार तर मुळीच नाही. कृपया आपण हे समजून घ्या की, या अल्पवयीन मुलींन बाबतच अशा घटना का घडतात? कारण या वृत्तीच्या तरुणांना चांगले माहित असते की एक फोटो जरी आपण या मुलीचा आपल्या मोबाईलवर काढला तरी मुली घाबरतील. मोबाईल वर विविध असे अॅप्लीकेशन उपलब्ध आहेत आहे की, फोटो क्रॉप करता येतो जेणे करुन चेहरा त्या मुलीचा असतो आणि खाली शरीर हे दुसर्या कोणीचे असते. आता या गोष्टी या अल्पवयीन मुलींना माहित नसतात. या सर्वांचा फायदा समाजकंटक घेतात. जर आपले नाते विश्वासाचे असेल तर मुली अशा धमक्यांना घाबरत नाही. यामध्ये वडीलांची भुमिका फार महत्वाची असते. कुढल्या स्तरापर्यंत आपण आपल्या मुलीचा विश्वास संपादन करु शकतो? यासाठी एक घटना सांगतोः- एका मित्राची वयात आलेली मुलीचे खरं प्रेम हे एका तरुणावर होते. मुलगी पुण्याला शिकायला गेली होती. घरच्यांना त्याच्या प्रेमाबद्दल माहित नव्हते. दोघांचे ऐकमेकांनसोबत शारीरीक संबंधसुध्दा होते. एक दिवस ते एका लॉजवर गेले. तीथे त्यांना नको त्या अवस्थेत एका समाजकंटकाने पकडले आणि मुलीला धमकी दिली की तुझ्या घरी फोन करुन तुझ्या वडीलांना बोलवतो? तो समाजकंटक त्या मुलीवर नजर ठेवून होता आणि तीच्या वडीलांना ओळखत सुध्दा होता. 90% अशा प्रसंगात मुली काय बोलतात? ते म्हणतात "कृपया घरी सांगु नका. आम्ही तुमचे वाटेल ते ऐकू." तेथे त्या मुलीचा गैरफायदा घेतला जातो आणि पुढे मग सातत्याने धमकुन तिचा वापर केला जातो. या मुलीचे वडीलांशी नाते हे विश्वासाचे होते. तीला हे माहित होते की मी जर चुकली तरी वडील मला सांभाळून घेतील. तीने त्या समाजकंटकाला सांगीतले तुम्ही कशाला मीच माझ्या वडीलांना फोन करते आणि मदत मागते. येथे मुद्दा हा आहे इतके विश्वासाचे नाते आपण आपल्या मुलीबरोबर निर्माण करु शकतो का? तर उत्तर हो आहे. यासाठी वडीलांनी पहिले पाऊल टाकायचे. त्यासाठी त्यांनी एक नियम करायचा की, वडीलांनी त्यांच्या आयुष्यात जर कोणी त्यांचा अपमान केला असेल, अथवा कुढल्या दु:खाला सामोरे जावे लागत असेल तर ते दु:ख, तो अपमान पत्नी बरोबरच मुली सोबत शेअर करावा. वयात येणारी आपली मुलगी विचार करते की बाबा एवढे मोठे आहे तरी ते त्यांचे प्रॉब्लेम, समस्या माझ्या बरोबर शेअर करतात, माझा सल्ला घेतात. जेव्हा कधी चुकुन आपली मुलगी अडचणीत सापडली तर ती पहिले आपल्या बाबांना फोन करते आणि मदत मागते कारण मनाचे दार बाबांनी नेहमी उघडे ठेवले असतात. खरं तर हे काम फक्त पालकांचे नाही. शाळेने पण पुढकार घ्यायला हवा. जेव्हा ही बातमी मी वाचली लगेच दुसर्या दिवशी मी आठवी ते दहावी मधील सर्व मुलींना बोलावले आणि एक विश्वास दिला की, मुलींनो एक सर म्हणून नव्हे तर एक मोठा भाऊ म्हणून मी नेहमी तुमच्या पाठीशी आहे. सोशल मिडीयावर काय काळजी घ्यायची हे सांगीतलेच पण चुकून काही संकट आले तर लपवू नका. घरच्यांना पहिले सांगा, आणि मला पण सांगा. घरच्यांना सांगण्यात काही अडचण आली तर मी त्यांना सांगेल. तुमच्या वर कीतीही संकट येवो मी तुमच्या सदैव बरोबर असेल आणि आम्ही सर्व जण संकटातुन बाहेर काढण्याचे काम करु (कुढलेही उपदेश न देता) मुलींवर हे बिंबवले की जगात फक्त तुमचे आईवडीलच तुम्हाला मदत करु शकता बाकी सर्व तुमचा फायदा घ्यायला बसले आहे. त्यामुळे आई-वडीलांपासून कुढलीही गोष्ट लपवायची नाही. ओळखीचा फायदा घेवून कोणी तुमचे फोटो काढत असेल तर त्यांना नाही म्हणा. वैयक्तिक फोटो काढू देवू नका. समजा कळत न कळत मैत्री वाढली आणि कोणी गैरफायदा घेवुन अथवा ब्लॅकमेल करुन तुम्हाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला स्पष्ट सांगा की, मी माझ्या वडीलांना सांगेल, माझ्या सरांना सांगेल. असा आत्मविश्वास प्रत्येक मुलीमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी मुक्त संवाद घरा-घरामध्ये होणे आवश्यक आहे तरच आपल्या घरातील कळी आनंदाने फुलुन येतील.
-सचिन उषा विलास जोशी, शिक्षणअभ्यासक
शाळा संस्कार देते असे म्हणतात. काही अंशी खरे सुध्दा आहे पण शिक्षणातील पध्दती मधुन प्रत्येक वेळस चांगले मूल्य रुजविले जातात असे नाही. शिक्षण पध्दती “प्रत्येक विद्यार्थ्यावर” संस्कार, मूल्य रुजविण्यात यशस्वी होते असेही नाही.
आपण कधीच कुठल्याही गोष्टीचा खोलात विचार करत नाही. आजच्या लेखात आपण द्वेष, स्पर्धा, हिनता, अपयशीपणा, तिरस्कार या भावना माणसांमध्ये कशा निर्माण होतात याचा शोध घेऊ या.
या भावनेंचा उगम कुठून होतो याचा विचार केला तर बर्याच गोष्टीचे “मूळ” समजतील. या जगात ऐवढी हिनता, हा इतका इनफिरीटी कॉम्प्लेक्स कोणी निर्माण केला? हा निर्माण केला आपल्या शिक्षणपध्दतीने, स्पष्टच बोलायचे झालेच तर या आपल्या पहिल्या क्रमांकाने येऊन दाखविणार्या शिक्षणानंच! कारण वर्गातील 35 मुलांपैकी कोणीतरीच एकजण पहिला येणार आहे. बाकीसर्व 34 विद्यार्थी मागे राहणार आहेत. ब्रम्हदेव जरी खाली आले तरी वर्गातील 35 मुलांना पहिला नंबर मिळणार नाही.
पण प्रत्येक आई वडीलांना वाटते माझा मुलगा अथवा माझी मुलगी “पहिली” यायला हवी. देशात पहिले नाहीत तर राज्यात, नाही राज्यात तर जिल्ह्यात तरी पहिली हवी. नाही आली जिल्हात तर किमान शाळेत तरी पहिली हवी. नाही सर्व विषयात तर किमान एका विषयात तरी पहिली हवीच हवी. पहिल्या दहा मध्ये येण्याचा पालकांच्या हट्टासा पोटी आपली शिक्षणपध्दती आणि आपली विचारसरणी पहिल्या येणार्याला प्रचंड सन्मान देते.
एका मुलाला पहिले आणण्याच्या पोटी त्या उरलेल्या 34 मुलांच्या मनांशी खेळतो आपण. एका मुलाला सन्मान देण्यासाठी 34 मुलांना अपमानीत करतो. या 34 विद्यार्थ्यांना निराश करते. एका मुलांचा गौरव करीत असतांना 34 मुलांचा कळत नकळत बळी दिला जातो. पण हे आपल्याला दिसत नाही. एकजण जिंकतो 34 जण हरतात. मग या 34 विद्यार्थ्यांमध्ये लागते स्पर्धा. वर्गात पहिले कोण येईल याची स्पर्धा आणि स्पर्धा मधुन कधीच प्रेम निर्माण होत नाही. स्पर्धेमधून फक्त द्वेष निर्माण होतात.
आपण नर्सरी पासून ते ग्रॅज्युशन पर्यंत म्हणजे तब्बल अठरा वर्षे या 34 विद्यार्थ्यांना (जे पहिले येत नाही ते.) आपण हरणं शिकवतोय. मानसशास्त्राचा “लॉ ऑफ कंडीशन” हा जर वापरला तर मेंदू मध्ये आपण या 34 मुलांना मागे राहणे, हरणे हे कंडीशनल करतोय. त्यांच्यात हाच हिनतेचा भाव निर्माण होतो की आपण हरणार; आपण कधी पहिले येणार नाही. यासर्वामधुन आपण एक पराभूत मनोवृत्तीची पीढी घडवतोय.
आपली शिक्षणपध्दती अपयशी वृत्तीचे माणसं घडवते. मग या माणसांना नेहमी वाटते की माझ्यात आत्मविश्वास नाही आहे. मला व्यवसाय चालवता येणार नाही, मला इंटरव्ह्यूव देता येणार नाही, मला चार चौघात बोलता येणार नाही,
आतापर्यंत आपल्या शिक्षणाने आमचे चेहरे दू:खी, उदास, पराभूत बनविले आहे आणि याला जबाबदार आपली परीक्षा पध्दती आहे. पहिल्या नंबररात पास होण्याची मानसिकता ही येणार्या पीढीचे चेहरे दु:खी, उदास बनवत आहे.
‘मी नेहमी अपयशीच होईल’ ही भावना आजची परीक्षा पध्दती विद्यार्थ्यांमध्ये रुजविते आहे. हे कुठे तरी बदलले पाहिजे. कमी मार्क पडणे, नापास होणे, पहिले न येणे हे काही कमीपणाचे नाही हा विचार सर्वांना पटला पाहिजे. परीक्षेवरील मार्कांवरुन कुठल्याही विद्यार्थ्याची लायकी ठरता कामा नये.
जर आपल्याला या पृथ्वीर अधिक प्रेम, सहकार्य हवे असेल तर ऐकमेकांमधील स्पर्धा थांबवायला हवी. अपयशी, उदास चेहर्याचे माणसं देश घडवू शकत नाही. कोठारी आयोगाचे प्रसिध्द वाक्ये आहे, “भारताची पीढी ही शाळेतील बेंचवर घडते आहे.” मग याच बेंचवर बसणार्या विद्यार्थ्यांमध्ये आपण स्पर्धा लावून देणे योग्य का?
आनंदी मनाची माणसं, दुसर्यांशी तुलना न करणारी माणसं, द्वेष न करणारी माणसं, स्वत:ला कमी न लेखनारी माणसं आपल्याला हवी आहे. त्यामुळे शाळे शाळेमध्ये, वर्गावर्गामध्ये प्रेम सहकार्याची भावना रुजविली पाहिजे आणि त्यासाठी परीक्षापध्दतीला बदलले पाहीजे, “ सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन” आपण अधिक उत्तम पध्दतीने चालविले पाहिजे.
सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन ही पध्दती प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये काय दडले आहे याचा शोध घेते. तो/ती विद्यार्थी काय घडू शकतो याचा विचार करते. “सब घोडे बारा टक्के” हा नियम येथे लागत नाही पण त्यासाठी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यानां परीक्षेत किती मार्क पडले यावर त्याचे मूल्यमापन करु नये.
पालकांनी सुध्दा “आय.क्यू.” वाढविण्यापेक्षा “ई.क्यू” आणि “एस.क्यू” वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. परीक्षेसाठी पाठांतर न राहता विषय समजवून घेवुन स्व:अध्ययनासाठी परीक्षा हा विचार पुढे यायला हवा.
मुलांची लायकी गुणांवर न ठरवता गुणवत्तेवर ठरवली तर मार्क कमी जरी पडले तरी मुलांच्या मनात कमीपणाची, हिनतेची भावना निर्माण होणार नाही. त्यांच्यात आपोआप सहकार्याची भावना रुजेल.
सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक
Request pls take as it is. Or call me pls
नुकताच शिक्षक दिन साजरा झाला. पाच सप्टेंबरच्या दिवशी शिक्षक किती महान असतात या बद्दल शाळेपासून ते सोशल मिडीयापर्यंत सर्वांकडे चर्चा होेती. आपला भारतीय संस्कृती शिक्षक मध्ये गुरुचे खूप महत्व पण आहे. प्रश्न हा आहे रोजच्या जीवनामध्ये आपण शिक्षकांना तेवढे महत्व देतो का? शिक्षकांना तेवढा सन्मान मिळतो का?
आपण रोजच्या जीवनात शिक्षकांना आदराने वागवतो का? जर हा प्रश्न आपण स्वत:ला विचारला तर प्रामाणिक उत्तर येईल ते म्हणजे ‘नाही’. आपण शिक्षकीपेक्षाकडे तीतके सन्मानाने पाहत नाही. जो डॉक्टर, इंजिनिअर, सि.ए., वैज्ञानिक घडवतो त्या शिक्षकाला संपुर्ण आयुष्यात शिक्षक दिनी फक्त दोन थँक्युचे शब्द मिळतात.
हे वाचल्यानंतर आपण मनात विचार करत असाल की आता शिक्षक त्या दर्जाचे राहिले नाही वगैरे वगैरे. मला असे वाटते प्रश्न दर्जाचा नसून सन्मानाचा आहे.
हल्ली विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांविषयी ना प्रेम दिसते ना पालकांच्या मनात. संस्थाचालकांना वाटते शिक्षक म्हणजे आपले नोकरच आहेत. हवे ते काम सांगा. राजकारणांना वाटते शिक्षक म्हणजे मोठी वोट बँक, आपले सर्व राजकारणातील कामे सांगायची हक्काचे व्यासपीठ. सरकारला वाटते कुठल्याही योजना आमलात आणायच्या असेल तर ‘बीन पगारी फुल अधिकारी’ म्हणजे शिक्षक. आजकाल आपण शिक्षकांना एवढे कामात अडवले आहे की तो/ती शिकवायचेच विसरुन गेला आहे. याचे कारण एवढेच की, आपला देश शिक्षकांना सन्मानाने वागवतच नाही.
ज्या देशात शिक्षकांचा सन्मान होत नाही. त्या देशाचे भवितव्य धोक्याच्या उंबरठ्यावर असते. आपल्याकडे जेव्हा शिक्षक राष्ट्रपती होतो. तेव्हा त्याचा सन्मान होतो. मला वाटले जेव्हा एक राष्ट्रपती प्राथमिक शिक्षक होईल तेव्हा खरा शिक्षकाचा सन्मान समजावा.
आजकाल खाजगी शाळेमध्ये पालकांचा अॅटिड्युड असा असतो की, मी फी भरतो म्हणजे शाळेवर उपकार करतो आणि शिक्षकांना तर विकतच घेतले आहे. एखादी नजर चुकीने शिक्षकांकडून चूक झाली तर पालक मुलांदेखील शिक्षकांना झापतात. अशा वागण्याने मुलांच्या मनावर शिक्षकांबद्दल आदर राहिल?
खाजगी अनुदानित शाळेत शिक्षकांना संस्थाचालकांच्या मर्जीने हाजी-हाजी करत वागावे लागते. तसे वागले नाहीतर सर्वांसोबत बिचार्याची लायकी काढली जाते. सरकारी शाळेतील शिक्षकांना तर नेहमीच टिकेचे धनी व्हावे लागते. जगात काही चुकीचे घडले तर त्याला तोच जबाबदार असतो. कुठेही शिक्षकांना आदराने, सन्मानाने वागविले जात नाही. राजकारण्यांपासून ते विचारवंतापर्यंत, विचारवंतापासून ते साहित्यकांपर्यंत सर्वच जण शिक्षकांना अक्कल शिकवत असतात. पण तो एक माणुस आहे, त्याच्यावरपण चांगले वाईट संस्कार झाले आहेत, कोणीही त्याची मानसिक स्थिती समजवून घेण्याच्या परिस्थीती मध्ये नसतो.
कारण आपण सर्वजण शिक्षकांना सन्मान देण्याऐवजी “शिक्षण सम्राटांना” सन्मान द्यायला लागलो आहे. संगणकामध्ये हार्डवेअरपेक्षा सॉफ्टवेअरला जास्त महत्त्व आहे. पण आपण सन्मान हार्डवेअरला देतो. त्यामुळे सॉफ्टवेअरमध्ये व्हायरस खुसला तर तो क्लिन करण्याकडे आपल्याला रस नसतो आणि मग आपण शिक्षकांच्या नावाने खडे फोडतो पण त्यांची मानसिकता विधायक कशी बनेल यावर खोलात जावून कधी विचार करत नाही.
शिक्षकांना सन्मानाने वागणूक नाही मिळाली तर काय होते ते आपण पाहू. जेव्हा आपण सर्वजण संस्थाचालक,पालक, एकूण समाज यांनी जर शिक्षकांना सन्मानाने वागविले नाही तर विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांबद्दल आदर राहणार नाही. जेव्हा विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांबद्दल आदर, प्रेम निर्माण होत नाही किंवा कमी होतो तेव्हा विद्यार्थ्यांच्या मनाचे दारे शिक्षकांबद्दल बंद होतात आणि मग ते शिक्षक कितीही जीव ओतून शिकवत असले तरी त्यांच्या डोक्यात काही शिरत नाही. कारण कळत नकळत त्यांच्या मनाची दारे बंद असतात.
तेच जर विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांबद्दल आदर प्रेम असेल तर त्याने जसे शिकवले ते त्याच्या मनात शिरते कारण मनाची दारे उघडी असतात. शिकणे-शिकवणे ही मानसिक प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया तेव्हाच घडते जेव्हा विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये एक अतुट बंधन असते. त्यासाठी शिक्षकांना सन्मानाने वागणूक दिली पाहीजे. कारण तो/ती समाज देश घडवत असतो. फक्त ते दृश्य स्वरुपात आपल्याला दिसत नाही.
जेव्हा शिक्षकांना सन्मानाने वागणूक मिळेल शिक्षक आपोआप जबाबदारीने अध्यापनाचे कार्य करतील. शिक्षकांना आर्थिक स्वरुपाच्या सोयी-सुविधा कमी देत असाल तरी चालेल पण त्यांना चार-चौघात आदर मिळायला हवा.
आजकाल शिक्षक असेल तर लग्नाला लवकर मुलगी सुध्दा मिळत नाही. मला वाटते जो पगार कॉलेजमध्ये प्राध्यापकाला मिळतो तो पगार प्राथमिक/पुर्व प्राथमिक शिक्षकांना मिळाला पाहिजे आणि याउलट पुर्व-प्राथमिक शिक्षकांचा पगार प्राध्यापकांना द्यायला हवा. कारण पाया रचणारा महत्वाचा असतो, कळस बांधणारा नाही.
संपूर्ण व्यक्तिमत्वाचा पाया पहिल्या बार्या वर्षाच्या आत रचला जातो. लहाणपणी मिळालेल्या अनुभवांवरच मुलांचे भावनिक आणि मानसिक स्वास्थ भविष्यात ठरत असेत. मग पुर्व-प्राथमिक शाळेत शिकवणारे शिक्षक हे उत्तम व्यक्तिमत्वाचे, विधायक मानसिकतेचे हवे. त्यासाठी या शिक्षकांचे योग्य कौतुक होणे, सन्मान होणे आवश्यक आहे. जणे करुन त्यांना अध्यापनाच्या कार्यात प्रोत्साहन मिळेल. त्यांना स्वत:मध्ये सातत्याने बदल करावसा वाटेल.
त्यासाठी समाजानं आपल्या बोलण्या-वागण्यात शिक्षकांना सन्मान द्यावा लागेल.
सोशल मिडीयावरील टिचर्स जोक बंद व्हायला हवे. एका दारुच्या कंपनीनेच व्हिस्कीचे नांव ‘टिचर्स’ ठेवल. त्यावर बंदी यायला हवी. पालक सभेमध्ये पालकांनी शिक्षकांशी बोलतांना नम्रपणा ठेवला पाहीजे. राजकरण्यांनी शिक्षकांचा वापर स्वत:च्या सोयीसाठी करणे थांबले पाहिजे. सरकारी अधिकार्यांनी शिक्षकांना अरे-तुरे ची भाषा बंद केली पाहिजे.
आज असे चित्र आहे की, सर्व ठिकाणी नोकरीचा अर्ज दिला आणि कुठेच नोकरी नाही मिळाली की, मग शेवटचा अर्ज शिक्षक होण्यासाठी असतो. मग शिक्षकाची नोकरी लागली की, पार्ट टाईम बी.एड. चा अभ्यासक्रम पुर्ण केला जातो. आपल्या देशात सर्वात शेवटचा करीअर मार्ग ‘शिक्षकी पेशा’ कडे पाहिले जाते आणि जपानमध्ये पहिले करीअरची पसंती टिचर्स होण्यासाठी असते.
जपानमध्ये शिक्षक होण्यासाठीची पात्रता परीक्षा ही भारतातल्या आय.ए.एस. परीक्षेच्या समानतेची असते. जपान नागरीक ती परीक्षा पास होऊ शकला नाही तर त्याला खुप वाईट वाटते किंबहुना तो रडतो कि मी शिक्षक होऊ शकलो नाही, शिक्षक होण्याची पात्रता माझ्यात नाही. ही भावना नागरीकांमध्ये येण्याचे कारण जपानमध्ये सर्वात जास्त सन्मान आणि आदर शिक्षकांना आहे.
अशा करु भारतात राजकारणी, सरकारी अधिकारी, संस्थाचालक, पालक आणि सर्व समाजच शिक्षकांना आदराने वागवेल. एक पुरस्कार आणि शिक्षक दिन सोहळे फक्त यांनी सन्मान मिळणार नाही तर आपल्या वागण्याबोलण्यातून प्रत्येक शिक्षकांसाठी यायला पाहिजे.
जेव्हा हा सन्मान येईल तेव्हा सारा देश शिक्षकांकडे आशेने पाहिले, त्यांच्या कार्याला रोज सलाम करेल, मुलांच्या स्वप्नांना भरारी देणारा कलाम शिक्षकांत पाहिल.
सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक
आजकाल चा जमाना झटपट रिझल्टचा आहे. इंस्टट मॅगी, फाडफाड इंग्रजी, पाच दिवसात व्यक्तिमत्व विकास या सारख्या गोष्टी सातत्याने येत आहे.सध्या फॅड चालू आहे ते तीन दिवसात तुमच्या मुलाचा मेंदू अॅक्टिव करून देण्याचे.
"मिड ब्रेन" नावाने चालणाऱ्या या बुवाबाजीला बहुसंख्य पालक फसताय. हो ही बुवाबाजी आहे. सायन्स मधील मेंदू शास्त्राची शास्त्रीय माहिती सांगून चक्क पालकांना फसवले जात आहे.
पालकांना विना मेहनत, कमी वेळेत आपल्या पाल्याचा मेंदू तल्लख करायची घाई झालेली असते. त्यामुळे ते मिड ब्रेन च्या फसव्या जाहिरातीला फसतात आणि पैशांचे नुकसान करून घेतात. तब्बल पाच ते पंधरा हजार रुपये ते एका मुलाचा मिड ब्रेन अक्टीवे करण्यासाठी घेतात.
काय भानगड आहे ही मिड ब्रेन ती नीट समजून घेऊ. "मिड ब्रेन" नावाच्या मार्केट मध्ये बऱ्याच कंपन्या आहेत. ते असा दावा करतात की तुम्ही ७ ते १६ वर्षा च्या मुलांनी आमचा तीन दिवसाचा कोर्से केला तर त्या मुलाचा मेंदू अॅक्टिव होतो. मग तो डोळे बंद करून (ब्लाइंड फोल्ड) करुन वाचू शकतो, वस्तूंचा रंग सांगू शकतो, समोर कोण उभा आहे ते सांगू शकतो. हे सांगता आले की झाला तुमच्या मुलाचा / मुलीचा मेंदू अॅक्टिव .
आता डोळ्याला काळी पट्टी बांधून हे ओळखणे सोपे आहे. जादुगार असे प्रयोग बऱ्याच वर्षांपासून आपल्याकडे करत असतात. काही जादुगार डोळ्याला घट्ट पट्टी बांधून गाडी सुद्धा चालवतात. डोळ्याला पट्टी जरी बांधली तरी बारीक फटी मधून त्यांना दिसत असते.
हे मिड ब्रेन वाले चक्क मुलांना खोट बोलायला शिकवतात. एका विशिष्ट अँगल ने पाहून सांगणे सोपे आहे. जर या मुलांचे खरच मिड ब्रेन एक्टिव होत असेल तर त्यांना काळा रुमाल डोळ्याला बांधून त्यावर स्विमिंग साठी वापरणारा गॉगल लावायला सांगितला तर ते डोळे बंद करून वस्तू ओळखू शकत नाही.
जर आपण वस्तू त्यांच्या डोळ्यावर अथवा पाठी मागे ठेवली तरी सुद्धा त्यांना वस्तू ओळखता येत नाही.
जर आपण त्यांना अंध मुलांचे मिड ब्रेन अॅक्टिव करा सांगितले तरी सुद्धा त्यांना ते अॅक्टिव करता येत नाही.
मुळात असला चमत्कार कधी होऊ शकत नाही. स्पर्श ज्ञान ने वस्तू मुलांना ओळखता येतात. वास घेवून वस्तू ओळखता येतात, वस्तूंचा आवाज केला तर कानाच्या साह्याने वस्तू ओळखता येतात. पण वस्तूंना हात न लावता, वास न घेता, आवाज न करता डोळे बंद करून वस्तू ओळखता येत नाही ना वस्तूंचा रंग सांगता येत. जे कोणी याचा दावा करता त्यांना अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती चे वीस लाख रुपयांचे आव्हान द्यावे. जो कोणी त्यांनी सांगितलेल्या अटीनुसार वस्तूंचे रंग ओळखेल त्यांना २० लाख रुपये मिळेल आणि मिड ब्रेन एक्टिव करता येते ही गोष्ट मान्य होईल.
आता ही फसवेगिरी असली तरी पालक का फसतात? याचे मुख्य कारण की हे मिड ब्रेन वाले मेंदू मानसशास्त्राच्या माहितीचा वापर करतात.
२१ व्या शतकात सर्वात मोठा शोध हा लागला की बालकाचा मेंदू घडतो कसा ? मुलं बुद्धिमान बनतात कसे ? मेंदू चा विकास हा जन्मापासून पहिल्या बारा वर्षांमध्ये होत असतो. लहानपणी मेंदूतील न्यूरान्स, पेशी जेवढ्या जिवंत राहतील, मेंदूतील न्यूरान्स चे एकमेकांशी जुळणी जेवढी घट्ट होईल तेवढ्या बालकाच्या विविध क्षमता विकसित होतात.
या माहितीचा वापर करून मिड ब्रेन कंपन्या पालकांना झटपट मेंदू तल्लख करण्याचे दावे करतात आणि पैसे उकळवतात.
बारा वर्षांमध्ये मेंदूची जडण घडण होत असते. पण बारा वर्षांचे काम तीन - चार दिवसात मेंदू अॅक्टिव करुन होत नाही.
आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल मग बालकाच्या मेंदू ची जडण - घडण होते कशी ? तर ती होते त्याला मिळणाऱ्या विविध अनुभवांमुळे. लहानपणी जितके विविध अनुभव आपण मुलांना देवू तेवढ्या जास्त प्रमाणात बालकांच्या क्षमता विकसित होत असतात.
मुलांना पाचही ज्ञानेंद्रियांचे अनुभव द्या. डोळे, कान, जीभ, नाक, त्वचा, या सर्वांचे अनुभव द्या. मुलांना खेळू द्या. डोंगरावर न्या, निसर्गाचा अनुभव द्या, घरातल्या प्रत्येक कामाचा अनुभव द्या, वयानुसार मुलांना प्रत्येक गोष्टीचे एक्स्प्लोजर द्या. या सर्वातून मुलांचा विकास होत असतो.
मिड ब्रेन अॅक्टिव सारख्या जाहिरातीना फसुन पालकांमध्ये फक्त नैराश्य येते. पालकांनी मुलांना क्वालिटी टाईम दिला आणि अनुभवसंपन पालकत्व स्वीकारले तर मुलांच्या मेंदूचा विकास झाला म्हणून समजा.
सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक
मी शाळेत असतांना कोणी प्रमुख पाहुणे आले तर त्यांचे रटाळ भाषण आम्हा विद्यार्थ्यांना शिक्षा दिल्या सारखे ऐकावयाला लावायचे. येणारे प्रत्येक पाहुणे एकच गोष्ट सांगायचे, ‘कोणासारखे तरी बना’, आदर्श व्यक्तिंचे नाव सांगुन तुम्ही तसेच बना.
आज कोणत्याही वक्त्याचे विद्यार्थ्यांनी भाषण ऐकले तर ते कोणाच्या तरी सारखे बनायला सांगतात.
शाळेत मुख्याध्यापक सुध्दा सामुहीक प्राथनेस तेच सांगतात, मुलांनो राम बना! परमहंस बना! विवेकानंद सारखे व्हा!, गांधी सारखे बना!
वर्गात सुध्दा शिक्षक तेच सांगतात. आदर्श व्यक्ती बना. जणू स्वत:खेरीज दुसरं कोणीतरी बनण्यासाठीच विद्यार्थ्यााचा जन्म झाला आहे.
शिवाजी बना! आंबेडकर बना! असे विद्यार्थ्यांना शिकवतो पण शिवाजीचे गुण, आंबेडकरांचे विचार आपल्या विद्यार्थ्यांमध्ये कसे निर्माण होतील याचा अंतरभाव शिक्षण अभ्यासक्रमात नाही ना शिक्षण पध्दतीत.
खरं तसं पाहिल तर कोणीही कोणासारखं बनत नसतं. प्रत्येक माणूस हा वेगळा असतो. प्रत्येक व्यक्ती ही युनिक असते. कितीही प्रयत्न केला तरी कोणी कोणाचीही फोटो कॉपी अथवा झेरॉक्स कॉपी होऊ शकत नाही.
या जगातील प्रत्येक व्यक्ती ही अद्वितीय आहे. रामाला होऊन आज एवढे वर्ष झाले, कोणी बनले रामा सारखे? येशु ख्रिस्ताला होवून एवढी वर्षे लोटली, बुध्द होवून जमाना झाला पण कोणी तसे येशू, बुध्द बनले का? पण मग आपण शाळेत, घरी-दारी सातत्याने कोणाची तरी कॉपी करायला का सांगतो.
आपण आज पर्यंत मुलांना असे म्हटले का नाही की, ‘तुम्ही तुमच्या सारखेच व्हा’. तुम्ही ‘तुम्हीच बना’! गुलाब गुलाबच असतो. लाख प्रयत्न केले तरी तो मोगरा होऊ शकत नाही.
पण आजकालची सर्व शैक्षणिक व्यवस्था, पालक व्यवस्था मोगर्याला, ‘गुलाब कसा बनवता येईल’ याच्या प्रयत्नात असते.
आजपर्यंत शिक्षणांन ही हिमंत दाखवलीच नाही की, ‘मुलांनो तुम्ही तुमच्या सारखे व्हा’! तुझं नावं धोंडीराम आहे तर तु धोंडीरामच बन. स्वत:च्याच नावाचा इतिहास कर, दुसर्याला कॉपी करु नकोस.
दुसर्यांचा आदर्श घेण्यापेक्षा स्वत:चा आदर्श बन. कारण माणसं आदर्शाच्या चौकटीत बसण्यासाठी जन्मलेलेच नाहीत.!
ज्यावेळी आपली शिक्षण पध्दती, आपले टिचर आणि आपले पालक, प्रत्येक विद्यार्थ्याला “तुम्ही तुम्हीच बना” सांगायची हिम्मत करतील तेव्हा त्या विद्यार्थ्यामधील व्यक्तीचा विकास होईल. यालाच व्यक्तिमत्त्व विकास म्हणतात.
प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक व्यक्ती ही महत्त्वाची आणि मौल्यवान आहे. ह्या निसर्गात जे जे दुर्मिळ असते ते ते मौल्यवान असते. या निसर्गात हिरे-मोती दुर्मिळ मिळतात म्हणून हिर्यांना प्रचंड मौल्यवान समजले जाते मग या निसर्गात एकच ‘सचिन जोशी’ आहे, एकच ‘तुम्ही आहेत’. तुमच्या सारखा मास्टर पिस याजगात शोधून सापडणार नाही. मग जे एक आहे ते दुर्मिळ आहे आणि जे दुर्मिळ आहे ते मौल्यवान आहे.
म्हणून प्रत्येकाला मनापासून असे वाटले पाहिजे की मी महत्त्वाची, मौल्यवान व अद्वितीय व्यक्ती आहे. माझी तुलना दुसर्यांबरोबर होवू शकत नाही. जेव्हा हा विचार शिक्षणपध्दती प्रभावीपणे विद्यार्थ्यांमध्ये रुजवेल तेव्हा प्रत्येक विद्यार्थी अधिक आनंदी आणि आदर्श व्यक्ति असेल.
दुसर्यांना कॉपी करण्याच्या भांनगडीत पडणार नाही, मी नेहमी विद्यार्थ्यांना एक कविता ऐकवत असतो,
‘हातात ठेवून दहा हिरे,
पहा जरा आरशाकडे,
अकरावा दिसेल कोहीनूर,
लक्ष जाता स्वत:कडे."
त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक कोहीनूर लपला आहे पण पालकांना, शिक्षकांना तो दिसत नाही. प्रत्येक मुलामध्ये एक हुशार मुल दडलं असतं. आपल्याला फक्त त्याची मूळ प्रतिभा शोधून काढायची असते.
पण आपण सातत्याने विद्यार्थ्यांना एक सारखे छाप बनवत असतो. एकाच पॅटर्नमध्ये आपण त्यांना बसवतो. आपले सारे प्रयत्न त्यांना एकाच साच्यात टाकण्याचे असतात.
राम चांगला आहे, कृष्ण सुंदरच आहे, पैगंबर उत्तमच आहे, येशु अप्रतिम आहे, बुध्द अद्वितीयच आहे पण या व्यतीरीक्त एक वेगळा स्वंतत्र व्यक्ती होण्यात एक वेगळीच मजा आहे.
एखादा व्यक्ती गांधीची कॉपी करु लागला तर अडचणी निर्माण होवू शकते. खरं तर आपण त्यांच्या मार्गांवर चालून स्वत:चा एक नविन मार्ग का बनवू शकत नाही?
तो मार्ग बनविण्याची हिम्मंत शाळेने दिली पाहिजे. शिक्षकाने सांगितले पाहिजे, ‘सर्व आदर्श व्यक्तींचे विचार समजून घे आणि त्यातून स्वत:ची एक विचार सरणी बनवं, मेढंरासारखं अनुसरण करु नको.’
त्यामुळे गुलाबाला कमळ बनवायला सांगू नका याने कमळ त्याची सर्व उर्जा सर्व शक्ती गुलाब होण्यात घालवेल. आणि शेवटी तो गुलाब तर होणार नाही पण कमळ बनण्याची दाट शक्यता होती ती पण नष्ट होईल.
यशवंतराव चव्हाण यांची एक गोष्ट वाचण्यात आली होती, यशवंतराव जेव्हा लहान होते तेव्हा शाळेत तपासणीस (स्कूल इन्सपेक्टर) आले होते. त्यांनी प्रत्येकाला विचारले तुम्हाला मोठेपणे काय व्हायचे? कोणी म्हणे, ‘मला शिवाजी व्हायचे,’ कोणी म्हणे, ‘मला टिळक व्हायचे’ पण जेव्हा या मुलाला विचारले की, ‘बाळा तुला मोठेपणी काय व्हायाचे?’ तेव्हा हा आठवीतला मुलगा म्हणाला, ‘मला यशवंतराव चव्हाणच व्हायचे आहे’.
माझ्या मते आपल्या विद्यार्थ्यांना सुध्दा ‘तुम्ही,तुम्हीच बना’ हे सांगू. प्रत्येक घरात, प्रत्येक शाळेत हा विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजला तर अधिक आनंदी, यशस्वी माणसं बनण्याची दाट शक्यता आहे.
सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक
मागील वर्षी सर्व न्युज चॅनेल यांनी एक बातमी प्रसिध्द केली. पाकिस्तान मधील सिंध सरकारने चायनिज भाषा शाळेत शिकवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सिंधचे मुख्यमंत्री कय्युम अली शाह आणि शिक्षणमंत्री पिर मजहरुल हक यांनी घेतला. 2013 पासून हा निर्णय सिंध राज्यात सुरु झाला आणि हळूहळू संपूर्ण पाकिस्तानमध्ये ही भाषा सहावीच्या विद्यार्थ्यांपासून शाळे मध्ये शिकवायला सुरूवात करणार आहेत.
आपण हे वाचून म्हणाल त्यामध्ये एवढे महत्वाचे काय? भारतामध्ये कितीतरी शाळेमध्ये फ्रेंच भाषा शिकवली जाते, जर्मन शिकवली जाते पण आपण समजुन घेतले पाहिजे की, भारतामध्ये कुठलीही परकिय भाषा (इंग्रजी वगळता) अनिवार्य शिकवली जात नाही. पाकिस्तानी सरकारने चायनीज भाषा त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना सहावीपासून त्यांच्या प्रत्येक शाळेत शिकवायचे अनिवार्य केले आहे. म्हणून हा महत्वाचा निर्णय.
या निर्णयामागचा राज्यकर्त्यांचा काय उद्देश् असेल ह्याचाही विचार करणे आवश्यक आहे. पाकिस्तानमध्येच भारतासारखे भरपूर इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. तिथील मुलं इंग्रजी भाषा शिकतात. पण सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये चायनिज भाषा अनिवार्य का? पाकिस्तान सरकार "पर्यायी भाषा" म्हणून ठेवू शकत होते. जसे आपल्याकडे फ्रेंच, जर्मन, संस्कृत भाषा या पर्यायी आहेत. अनिवार्य करण्या मागे काय कारणे आसवित ते पाहू.
चायना ज्या पद्धतीने जगा पुढे येत आहे आणि त्यातून एक बलाढ्य राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करीत आहे. टाचणी पासून ते विमानापर्यंत प्रत्येक वस्तू प्रत्येक गोष्ट ही ‘मेड इन चायना’ आहे. ही सर्व प्रगती त्यांनी त्यांच्या मातृभाषेच्या जोरावर केली.
जगातले सर्व तंत्रज्ञान, तत्वज्ञान आणि जगातील सर्व विज्ञान त्यांनी त्यांच्या मातृभाषेत आणले आणि मग प्रत्येक वस्तूची निर्मित्ती करून जगातले बहुतांशी मार्केट काबीज केले. आपण पाहतो अशी कुठलीही वस्तू नाही जी ‘मेड इन चायना’ नाही.
चायना इंग्रजी शिकले नाही आता ते त्यांची भाषा दुसर्या देशात ते शिकायला प्रवृत्त करतात. पाकिस्तानमध्ये चायनिज भाषा शिकवणे हा निर्णय एकटा पाकिस्तान सरकारचा की चायना सरकारी ची पण इच्छा आहे हे त्यांनाच माहित.
भारत चीन संबंध नाजूक आहेे. चिन बरोबर भारताचे एक युध्द झाले आहे आणि पाकिस्तान बरोबर सुध्दा.. आणि पाकिस्तान सरकार चिन बरोबर संबध घट्ट करण्यासाठीचे “चायनिज भाषा शिकणे” हे पहिले पाऊल आहे असे मत पाकिस्तानी राज्यकर्ते देत आहेत.
चीन व पाकिस्तान दोन्ही आपले शेजार राष्ट्र आहे. पाकिस्तान भूमिचा वापर दहशतवादी कृत्यांसाठी होत असतो, अशी आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा आहे. अमेरीकेने पाकिस्तन विविध प्रकारे मदत केली असली तरी आता अमेरीकेला पाकिस्तान नकोशे झाले आहे. याचमुळे का पाकिस्तान सरकार चायनी भाषा शिकायचे ठरवते आहे? का पाकिस्तान मधील बेरोजगारी कमी करण्यासाठी चायनिज भाषा शिकायला अनिवार्य करीत आहे? का चीन मधील सर्व अद्यावत तंत्रज्ञान शिकून घेण्यासाठी प्रत्येक शाळेत सहावीपासून मुलांना ही भाषा अनिवार्य करीत आहे? काय कारणे असली पाहिजे?
आता तरी पाकिस्तान सरकार म्हणंतय की स्कॉलरशिप मिळविण्यासाठी आम्ही मुलांना ही भाषा शिकवत आहे. पण मग मुळ मद्दा हा येतो की ही भाषा पर्यायी ठेवावी, अनिवार्य करु नये. कारण तेथील शैक्षणिक परिस्थिती भारतापेक्षा बरीच वाईट आहे.
भारतामधील शालेय विद्यार्थ्यांना अजून शाळेत निट इंग्रजी बोलता येत नाही. मग तेथील मुलं इंग्रजी बरोबरच चायनिज या दोन-दोन परकीय भाषा कशा शिकतील? त्यात जगातील सर्वात अवघड भाषा म्हणजे चायनिज भाषेशी ओळख आहे. तेथील मुलांना उर्दू, अरेबी, सिंध या पण भाषा शिकायचे आहेतच ना.. मग हेच अधिक बोजे ते अनिवार्य का?
कदाचित असेही असू शकतं की, अमेरीका, ऑस्टे्रलियापेक्षा चीन मधील उच्चशिक्षण हे अधिक स्वस्त असू शकतं आणि हे “स्वस्त: उच्च शिक्षण” पाकिस्तनामध्ये येणार्या पिढीला घ्यायचे असेल तर चायनिज भाषा येणे हे अनिवार्य आहे.
पाकिस्तान अधिकच कर्जात बुडालेला देश आहे. भविष्यात उच्च शिक्षणासाठी त्यांना दुसर्या विकसीत देशावर अवलंबून राहणे गरजेचे आहे. त्यात गेल्या काही वर्षात पाकिस्तानी नागरीकांना अमेरीका आस्ट्रेलियामध्ये संशयानेच पाहिले जाते. म्हणून कदाचित चीनवर अवलंबून राहयाची वेळ आली तर त्यांची भाषा येणार्या पाकिस्तानी पीढीला माहिती पाहिजे. म्हणून त्यांच्या सरकारने चायनिज शिकणे अनिवार्य येणे असेल.
कारणं काहीही असो, पण भारतातील शिक्षण मंडळाला हे सुचले नाही की, शाळेपासून चायनिज भाषा अनिवार्य नाही पण पर्यायी ठेवावी. कारण भारत या गोष्टीकडे अधिक विधायक दृष्टिकोनातून बघू शकेल. परकिय भाषा शिकण्याच्या प्रामाणिक उद्देश विकासासाठीच करावा हे भारत करू शकेल. शंका थोडी पाकिस्तान बद्दल आहे.
शेवटी शिक्षणाचा उद्देश हा रोजीरोटी कमविण्याबरोबरच एक चांगला माणूस घडावा हा आहे. चायनिज भाषा शिकून येत्या 20 वर्षानंतर पाकिस्तान मधील रोजी रोटीचा प्रश्न सुटत असेल तर तेथील पीढीला उत्तमच आहे.
चायनिज शिकून पाकिस्तानामध्ये विकासासाठी तंत्रज्ञानाची गंगा येत असेल तर एका देशाच्या प्रगतीसाठी हे अधिकच उत्तम आहे. त्यासाठी तेथील राज्यकर्त्यांची दूरदूष्टीचे कौतूकच केले पाहिजे.
येत्या 20-25 वर्षात पाकिस्तान मेड इन चायना बनण्याची शक्यता आहे. भारतातील तरूणांनी याचा जरूर विचार करावा. चायना कडून तंत्रज्ञान शिकून भारतामध्ये प्रत्येक गोष्ट मेड इन इंडिया कशी बनेल याचा...
सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक